सांगलीत पाच हजार विद्यार्थ्यांनी साजरा केला सूर्योत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 06:36 PM2019-12-26T18:36:44+5:302019-12-26T18:38:02+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सूर्योत्सवाचा उपक्रम आयोजित केला होता. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. क्रीडांगणावर सकाळी सातपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. रांगेत शिस्तबद्ध बसून ग्रहणाविषयीची शास्त्रीय माहिती ऐकली.
सांगली : ग्रहणासंदर्भात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा मोडीत काढण्याची कामगिरी पाच हजार विद्यार्थ्यांनी केली. सांगलीत शिवाजी क्रीडांगणावर एकाचवेळी पाच हजार विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिले. त्याचा आनंद घेतला. त्याचवेळी अन्नग्रहण करत गैरसमजुतीही खोडून काढल्या.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सूर्योत्सवाचा उपक्रम आयोजित केला होता. शहरातील विविध शाळांचेविद्यार्थी सहभागी झाले होते. क्रीडांगणावर सकाळी सातपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. रांगेत शिस्तबद्ध बसून ग्रहणाविषयीची शास्त्रीय माहिती ऐकली. ग्रहण म्हणजे काय आणि त्याचे परिणाम-दुष्परिणाम काय, याचे मार्गदर्शन अंनिसचे राहुल थोरात, संजय बनसोडे यांनी केले.
सकाळपासून आकाश ढगाळल्याने ग्रहण दिसण्याविषयी साशंकता होती; पण नऊच्या सुमारास मळभ दूर होऊ लागले. ढगांचा लपंडाव मात्र सुरूच राहिला. त्यातूनही विद्यार्थ्यांनी सौर चष्म्यातून ग्रहण पाहिले. सूर्याच्या विविध अवस्था अनुभवल्या. ग्रहणावेळी खाऊ-पिऊ नये, हा गैरसमज खोडून काढत खाऊ खाल्ला व पाणीदेखील पिले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग, उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, कक्षअधिकारी उल्हास भांगे, अधिक्षक धनंजय जाधव, विस्तार अधिकारी सुशिला बस्तवडे, पोपट मलगुंडे यावेळी उपस्थित होते. खगोल अभ्यासक डॉ. नितीन शिंदे, प्रा. प. रा. आर्डे यांनी माहिती दिली. खास तयार केलेल्या सेल्फी पॉर्इंटवर तरुणांनी गर्दी केली होती. सूर्याची कंकणाक ार स्थिती दिसताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. असा उपक्रम देशातील पहिलाच असल्याचा दावा थोरात यांनी केला. त्याचे फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपणही केले गेले.