मोदी साहेब, आमचे भविष्य अंधकारमय करू नका; जुन्या पेन्शनसाठी पाच हजारांवर शिक्षकांची पत्राद्वारे मागणी
By अशोक डोंबाळे | Published: September 5, 2023 01:57 PM2023-09-05T13:57:56+5:302023-09-05T14:00:37+5:30
शिक्षक दिनी जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे अनोखे आंदोलन
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, सेवानिवृत्तीनंतरचे आम्हा शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय होऊ नये, यासाठी जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करा, अशी मागणी करणारी पत्र पाच हजार शिक्षकांनी पंतप्रधानांना मंगळवारी पाठविली.
पोस्ट कार्यालयाच्या बाहेर अनेक शिक्षक एकत्र जमले होते. शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, संपूर्ण देशभर आज शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपल्या नेतृत्त्वात भारत जगात आपली नवीन ओळख बनवत आहे. उद्याचा जबाबदार, प्रतिभाशाली, संवेदनशील, नागरिक आमच्या शाळातून घडला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वतोपरी योगदान देत आहोत, शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. सैनिक सीमेवर राहून देशाचे रक्षण करत आहेत. त्यांच्याबद्दल माझी मन की बात आपल्याला सांगावी वाटत आहे. म्हणून हे पत्र लिहीत आहे. आपण आमच्या भावना समजून घ्याल, हा विश्वास आहे.
आज शिक्षक म्हणून काम करताना आमच्या सेवानिवृत्तीनंतर काय? असा प्रश्न मला आणि देशभरातील राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असणाऱ्या शिक्षक व सर्वच कर्मचारी यांना पडला आहे. याचे कारण ही शेअर मार्केट आधारित योजना उद्याच्या प्रगत भारतात आम्हा कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी नाही, हे आता लक्षात येत आहे. तरी
आपण आमचे सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य अंधकारमय होऊ देणार नाही, अशी अपेक्षा आहे. माझी आपणास आजच्या शिक्षक दिनी विनंती आहे की, आपण सर्व शिक्षक, सैनिक तसेच देशातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याची राष्ट्रीय पेन्शन योजना बदलून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही विनंती.
या अनोख्या आंदोलनात जुनी पेन्शन संघटनेचे विभागीय अध्यक्ष सागर खाडे, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले, मिरज तालुकाध्यक्ष रमेश मगदूम, तालुका संघटक अझरुद्दीन जमादार, वैजनाथ आवताडे, अनिल मुंडे, अमोल सातपुते, शिक्षक नेते सुधाकर हजारे आदीसह जिल्ह्यातील पाच हजारांवर शिक्षक सहभागी झाले होते.
आंदोलनाची तीव्रता वाढविणार
आतापर्यंत शिक्षकांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाने शिक्षकांसह सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे गरजेचे होते. पण, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यास यापुढे तीव्र आंदोलन करावे लागणार आहे, असा इशारा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिदे यांनी दिला.