कृष्णा नदीत दरमहा पाच टीएमसी पाणी सोडणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:14 PM2023-11-24T17:14:44+5:302023-11-24T17:16:06+5:30

आमदार अनिल बाबर यांची माहिती

Five TMC water will be released in Krishna river every month, Testimony of Chief Minister Eknath Shinde | कृष्णा नदीत दरमहा पाच टीएमसी पाणी सोडणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

कृष्णा नदीत दरमहा पाच टीएमसी पाणी सोडणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

विटा : सांगली जिल्ह्यातील नदीचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीपात्रात दरमहा पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे आदेश संबंधित विभागाला दिले असल्याचेही आमदार बाबर यांनी सांगितले.

आमदार बाबर म्हणाले की, कृष्णा नदीतून पाणीउपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील नदीचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. परिणामी, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सतत होत होती.

याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचाही पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. मात्र, पाणी सोडले जात नव्हते. याप्रकरणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे बोट दाखविले जात होते. मात्र, याबाबत मंत्री शंभूराज देसाई आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संपर्क साधला. यावेळी त्यांना सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पाण्याची सद्य:स्थितीची कल्पना दिली. तसेच विजेसाठी अन्य पर्याय आहेत. मात्र, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी गरजेचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. कृष्णा नदीमध्ये कोयना धरणातून दरमहा पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती.

यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत. शिवाय, दरमहा महिन्यातून कृष्णा नदीमध्ये पाच टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत, असेही आमदार बाबर यांनी सांगितले.

Web Title: Five TMC water will be released in Krishna river every month, Testimony of Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.