पाच वर्षात डिजिटल युग अवतरेल
By admin | Published: August 29, 2016 12:16 AM2016-08-29T00:16:23+5:302016-08-29T00:16:23+5:30
प्रदीप लोखंडे : सांगलीच्या ब्रॅन्डिंगसाठी जोरदार प्रयत्न गरजेचे
सांगली : भारत वेगाने बदलत असून, त्याला कुणीही रोखू शकत नाही. आगामी पाच वर्षात नव्या तंत्रज्ञानाचे डिजिटल युग अवतरेल, असे मत रुरल फौंडेशनचे प्रदीप लोखंडे यांनी शनिवारी सांगलीत व्यक्त केले.
बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ सांगलीत पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड होते. यावेळी लोखंडे म्हणाले की, सांगलीचे ब्रँडिंग करणे शक्य आहे. बुध्दिबळ, हळद, सैनिकांची परंपरा हे सांगलीचे ब्रँड आहेत. त्याचे भांडवल करावे. भारत वेगाने बदलतोय, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. देशाच्या उभारणीत बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोठे आहे. लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचा वाटा आहे. पुढच्या पाच वर्षात ९० टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी आॅनलाईन काम सुरु होईल.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, सांगलीचे ब्रँडिंग करताना कृष्णा नदी ही ताकद होती. शहरातील रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. दोन रस्ते का चांगले करता येत नाहीत. काळी खण सुशोभिकरणाचा पहिला टप्पा क्रीडाई करणार आहे. क्रीडाईने वृध्दांसाठी स्कीम कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. क्रीडाईचे राज्य उपाध्यक्ष राजीव परीख, नूतन अध्यक्ष विकास लागू, सचिव उपस्थित होते. योगेश कुलकर्णी, दीपक सूर्यवंशी, रवींद्र खिलारे, किशोर पटवर्धन उपस्थित होते. राजीव परीख, दीपक सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)