ऊसाला प्रतीटन ३५०० रुपये दर निश्चित करा; शेतकरी संघटनेची सचिवांकडे मागणी
By अशोक डोंबाळे | Published: August 19, 2023 06:00 PM2023-08-19T18:00:55+5:302023-08-19T18:01:36+5:30
शेतकरी संघटनेची मुख्य सचिवांकडे मागणी : कारखान्यांकडील शेतकऱ्यांची थकीत बिल मिळावीत
अशोक डोंबाळे /सांगली
सांगली : शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांचेकडे २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रतीटन तीन हजार ५०० रुपये दर ठरवण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांना संघटनेतर्फे निवेदनही दिले.
शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले, रामचंद्र कणसे, किसन पाटील, शंकर कापसे, मोहन परमने, आप्पा हरताळे, हिंदुराव अस्वले, हणमंत कणसे, दयाभाऊ कांबळे यांच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांकडील थकीत ऊसाची बिल मिळावीत. तसेच मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या ऊसाची अंतीम बिल शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार ५०० दर निश्चित करुन मिळाली पाहिजेत, अशी मागणी केली.
प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे म्हणाले, २०१८-१९ हंगामातील केन अँग्रो एनर्जी या कारखान्याकडील थकीत रक्कम ठरवण्याचे काम कर्ज वसुली न्यायाधीकरणाकडे चालू आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. म्हणून शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा एकत्र दि. २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करून आपले नांव, ऊसाचे वजन व रक्कम कळविण्याची गरज आहे. शेतकरी माहिती देतील, त्यांचेच पैसे मिळणार आहेत. तसेच वसंतदादा साखर कारखान्यांकडे २०१३- १४ च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची काही बिल थकीत आहेत. थकीत ऊसबिला विषयी कारखान्याने येत्या आठवड्यात शेतकरी व रक्कमांची अंतिम यादी देणार आहेत.