युतीने नाकारल्यास महायुतीचा झेंडा

By Admin | Published: July 8, 2015 11:51 PM2015-07-08T23:51:33+5:302015-07-08T23:51:33+5:30

इच्छुकांची भूमिका : विटा बाजार समिती निवडणुकीसाठी वातावरण तापले

The flag of the Mahayuti, if rejected by the alliance | युतीने नाकारल्यास महायुतीचा झेंडा

युतीने नाकारल्यास महायुतीचा झेंडा

googlenewsNext

दिलीप मोहिते - विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. शिवसेना, कॉँग्रेस व भाजपने युती केली असतानाच युतीच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक होणार आहे. आ. अनिल बाबर, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या युतीने उमेदवारी नाकारल्यास युती समर्थक उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महायुतीचा झेंडा हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कडेगाव व खानापूर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया अजून आठ दिवस पुढे असली तरी, वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जुनी शिवसेना, भाजपसह समविचारी पक्षांची महायुती झाली आहे, तर खानापूरचे विद्यमान आ. अनिल बाबर यांची शिवसेना, कडेगावचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांची कॉँग्रेस व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या भाजपत युती झाली आहे. युतीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच उमेदवारांची यादी अंतिम होणार आहे. कडेगाव तालुक्याला दहा जागा मिळाल्यास त्यातील कॉँग्रेस व भाजपला प्रत्येकी पाच उमेदवारांची यादी जाहीर करावी लागणार आहे.
त्यामुळे युतीत जागा कमी व इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या युतीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अंतिम क्षणी युतीने उमेदवारी नाकारल्यास महायुतीचा पर्याय स्वीकारण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे नाराजांना जाळ्यात ओढून उमेदवारी देण्यासाठी महायुतीनेही हिरवा कंदील दाखविल्याचे वृत्त आहे.

महायुतीच्या नेत्यांचा कडेगाव दौरा
राष्ट्रवादी पुरस्कृत महायुतीच्या नेत्यांनी कडेगाव तालुक्यातील उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, माजी नगरसेवक सचिन शितोळे, शिवसेनेचे संजय विभुते, शेतकरी संघटनेचे रामभाऊ कणसे, रिपाइंचे बाबासाहेब कांबळे यांनी शाळगाव, कडेगाव, शिवणी, विहापूर, आंबेगाव, हिंगणगाव, येडे, अपशिंगे, नेर्ली, कोतवडे यासह अन्य गावांचा संपर्क दौरा केला. त्यावेळी इच्छुकांनी युतीने उमेदवारी नाकारल्यास थेट महायुतीच्या गोटात सहभागी करून घ्यावे, अशी इच्छा व्यक्त केल्याचे समजते.

Web Title: The flag of the Mahayuti, if rejected by the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.