ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवा, नंतर गटा-तटाचं बघू--जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:08 AM2017-09-24T00:08:16+5:302017-09-24T00:08:16+5:30
इस्लामपूर : काँग्रेस आघाडी शासनाच्या कारकीर्दीत गावपातळीवरील पदे मिळविण्यासाठी ‘जयंत एक्स्प्रेस’ खचाखच भरत होती.
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : काँग्रेस आघाडी शासनाच्या कारकीर्दीत गावपातळीवरील पदे मिळविण्यासाठी ‘जयंत एक्स्प्रेस’ खचाखच भरत होती. सत्ता गेल्यापासून राष्ट्रवादीचे काही डबे रिकामे झाले आहेत. त्यातच इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला पराभव दाखवला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत सत्ता मिळवा, त्यानंतर गटा-तटाचं बघू, असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
वाळवा तालुक्यात राजारामबापू उद्योग समूहामुळे राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. ग्रामीण भागासह इस्लामपूर, आष्टा शहरातील सहकारी संस्थांवर आमदार पाटील यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि माजी आमदार विलासराव शिंदे राष्ट्रवादीत असले तरी, त्यांच्याही सहकार आणि शिक्षण संस्था आहेत.
डांगे यांची ग्रामीण भागात सत्ताकेंद्रे नाहीत. शिंदे यांचा गट स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्यातच त्यांचे पुत्र वैभव शिंदे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे आष्टा आणि परिसरातील कोरेगाव, बागणी, ढवळी, शिगाव, बहाद्दूरवाडी आदी गावातून राष्टÑवादीविरोधक टिमकी वाजवू लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादीमध्ये गटतटाचे राजकारण नेहमीच पेटलेले असते. त्याचा परिणाम आता ग्रामपंचायत निवडणुकीवर होणार असल्याने आमदार पाटील यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे.
आ. पाटील यांचे खंदे समर्थक पी. आर. पाटील (कुरळप), माणिकराव पाटील (बोरगाव), दिलीपराव पाटील (वाळवा), विनायकराव पाटील (ताकारी), रवींद्र बर्डे (वाटेगाव), जनार्दनकाका पाटील (कासेगाव), विजयबापू पाटील (साखराळे) या नेत्यांवर ग्रामपंचायत निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र बोरगावसारख्या ठिकाणी राज्य पातळीवरील नेते असलेल्या माणिकराव पाटील यांनाही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते चकवा देत आहेत. कोरेगाव येथे राष्ट्रवादीचे बी. के. पाटील आणि आर. के. पाटील हे दोन गट एकमेकांविरोधात नेहमीच असतात. उर्वरीत सर्वच गावांमध्ये राष्ट्रवादीचे एक, दोन आणि काही ठिकाणी तीन-तीन गट सक्रिय आहेत.
राष्ट्रवादीतील गटबाजी आणि भाजपने प्रत्येक गावात सुरु केलेला शिरकाव, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक यांचे गट यामुळे आमदार पाटील यांच्यापुढे निवडणुकीचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. यामुळे त्यांनी आधी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवा, नंतर गटातटाचे बघू, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.
राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय गट एकत्रराष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. याचा फायदा उठविण्यासाठी भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, महाडिक गट, नाईक गट एकत्र येऊन राष्ट्रवादीला खिंडीत अडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. काही गावातून राष्ट्रवादीचे नाराज गट या विरोधकांना सामील होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतील सर्वच गटांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. सरपंचपद पदरात पाडून घेण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी बहुतांशी गावातील कार्यकर्त्यांना गट विसरुन एकत्रित येण्याचा सल्ला दिला आहे. परंतु उमेदवारीबाबत कोणालाही बळजबरी केलेली नाही. राष्ट्रवादीची सर्वच ग्रामपंचायतीवर सत्ता राहील, याची काळजी घेण्यात आली आहे.
- विजयबापू पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी.