जिल्ह्यातील तरुणांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:29 AM2021-09-26T04:29:35+5:302021-09-26T04:29:35+5:30
सांगली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इस्लामपूरच्या अल्ताफ शेख व कोतवडे (ता. कडेगाव) येथील रणजित यादव या दोघांनी ...
सांगली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इस्लामपूरच्या अल्ताफ शेख व कोतवडे (ता. कडेगाव) येथील रणजित यादव या दोघांनी घवघवीत यश मिळवीत जिल्ह्याचा झेंडा देशपातळीवर फडकविला. याशिवाय वालचंद महाविद्यालयाच्या चार, तर इस्लामपूरच्या अन्य दोघा विद्यार्थ्यांनीही यश मिळविले. हे तरुण परजिल्ह्यातील आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्या परीक्षेत सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाचे कमलकिशोर कंधारकर १३५ व्या, प्रथमेश राजशिर्के यांना २३६ व्या, श्रावण कांबळे ५४२ व्या, तर हर्षल घोगरे ६१४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील अल्ताफ माेहंमद शेख याने देशात ५४५ वा क्रमांक मिळवीत बाजी मारली. इस्लामपूरच्या आरआयटीमधील कडेगाव तालुक्यातील कोतवडेचे रणजित यादव ५१३ व्या क्रमांकाने, तर आनंद पाटील यांनी दिव्यांग गटातून यश मिळविले. आनंद पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील आहेत. रणजित यादव यांनी २०१७-१८ मध्ये आरआयटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती.
जिल्ह्याच्या दोघांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील यश मिळविणारे दाेघेही तरुण इस्लामपुरात शिकत होते. त्यामुळे यानिमित्ताने इस्लामपूरचे नावही शैक्षणिक पटलावर चमकत आहे.
चौकट
वालचंद महाविद्यालयात आनंद
वालचंद महाविद्यालयातून उत्तीर्ण होत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या चार तरुणांना मिळालेल्या यशाने वालचंद महाविद्यालयातही आनंद व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयात असतानाच यातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यासाठीची पूर्वतयारी केली होती.
चौकट
आरआयटीच्या शिरपेचात मानाचा तुरा
इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोघांनी मिळविलेल्या यशामुळे या संस्थेच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.