सांगलीला पुराचा धोका, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

By अविनाश कोळी | Published: July 22, 2024 05:35 PM2024-07-22T17:35:49+5:302024-07-22T18:08:24+5:30

महापालिकेकडून आवाहन : अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

Flood risk in Sangli, vigilance alert in riverside settlements | सांगलीला पुराचा धोका, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

सांगलीला पुराचा धोका, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

सांगली : शहरात पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्याने महापालिकेने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कृष्णेची पाणीपातळी २५ फुटांवर गेल्याने कधीही स्थलांतर करावे लागेल, अशी सूचना नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आली आहे.

सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी गतीने वाढत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यंत तब्बल आठ फुटाने पाणीपातळी वाढली. रात्रीत वाढलेल्या पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. तीस फुटांवर पाणीपातळी गेल्यानंतर नदीकाठी असलेल्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड वरील शिव मंदिर परिसर, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी या भागांमधील नागरिकांचे स्थलांतर करावे लागते.

त्यामुळे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. बैठकीनंतर अतिरिक्त आयुक्तांनी नदीकाठच्या लोकवस्त्यांची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधून सतर्क राहण्याबाबत सूचना दिली.

महापालिकेची यंत्रणा सज्ज

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आवश्यक त्या सोयी सुविधांसह यंत्रणा सज्ज आहे.

दोन स्वतंत्र पथके

एन. डी. आर. एफ. आणि महापालिका अग्निशमन दल अशी पथके तयार आहेत. अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समनव्याने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

चोवीस तास वॉर रुम कार्यरत

आयुक्त गुप्ता यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत चोवीस तास वॉर रूम कार्यरत असणार आहे. पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनच्या सुचनेचे पालन करावे. त्यांना मदतीची आवश्यता असल्यास वॉर रुमशी संपर्क करावा. अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही यासाठी जाहीर करण्यात ाअले आहेत.

निवारा केंद्रांची सोय

प्रशासनाने यापूर्वी पूरग्रस्तांनी सोबत घ्यावयाची महत्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना अत्यावश्यक साहित्य घेऊन महापालिकेने निश्चित केलेल्या निवारा केंद्रात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Flood risk in Sangli, vigilance alert in riverside settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.