सांगलीत जलप्रलय! अनेक गावं पाण्याखाली; 10 हजार कुटुबांचं केलं स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 01:01 PM2019-08-07T13:01:36+5:302019-08-07T13:02:06+5:30
जिल्हा स्तरावर 24 नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. तसेच, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), टेरिटोरियल आर्मी, कोल्हापूर, पुणे-चिंचवड महानगरपालिका पथक अशा पथकांना पाचारण करण्यात आले असून, यामध्ये 211 जवानांचा समावेश आहे. ही पथके इस्लामपूर - वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यात बचाव कार्य करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 282 कुटुंबांतील 53 हजार 228 लोक व 16 हजार 633 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिली.
सरासरी 481.8 मि. मी. पाऊस
कोयना, वारणा या धरण क्षेत्रात 3 ऑगस्टनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जूनपासून दि. 7 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेपर्यंत अखेर सरासरी 481.8 मि. मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस शिराळा (1429.2 मि. मी.), वाळवा (582.6 मि. मी.) आणि सर्वात कमी पाऊस आटपाडी (177.8 मि. मी.), जत (169.5 मि. मी.) या तालुक्यांमध्ये झाला आहे.
कोयना, वारणा धरणातून विसर्ग
कोयना धरणाची क्षमता 105.24 टी. एम. सी. असून पाणीसाठा 102.21 टी. एम. सी. (97 टक्के) आहे. तर दि. 6 ऑगस्टपर्यंत 1 लाख 22 हजार 475 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. वारणा धरणाची क्षमता 34.40 टी. एम. सी. असून पाणीसाठा 32.26 टी. एम. सी. (93.77 टक्के) आहे. तर दि. 6 ऑगस्टपर्यंत 30 हजार 114 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आलमट्टी धरणाची क्षमता 123 टी. एम. सी. असून पाणीसाठा 92.85 टी. एम. सी. (75 टक्के) आहे. तर दि. 6 ऑगस्टपर्यंत 4 लाख 24 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
पुनर्वसनाचे काम युद्ध गतीने
सांगलीच्या आयर्विन पुलाची इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 54.4 फूट होती. या पार्श्वभूमिवर आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 282 कुटुंबांतील 53 हजार 228 लोक व 16 हजार 633 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील 18 गावांतील 3 हजार 64 कुटुंबांतील 17 हजार 655 लोक व 5 हजार 447 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 21 गावांतील 3 हजार 203 कुटुंबांतील 14 हजार 389 लोक व 3 हजार 694 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 28 गावांतील 2 हजार 60 कुटुंबांतील 12 हजार 765 लोक व 5 हजार 622 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 17 गावांतील 148 कुटुंबांतील 667 लोक व 1 हजार 427 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 7 हजार 752 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पाणीपातळी 2 फूट वाढल्यास आणखी 5 हजार 293 कुटुंबांतील 25 हजार 206 व्यक्ती व 1 हजार 844 जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे लागेल.
पाण्याखाली गेलेले रस्ते व रेल्वेमार्ग
जिल्ह्यातील 22 राज्य मार्ग, 29 प्रमुख जिल्हा मार्ग, 1 इतर जिल्हा मार्ग व 1 ग्रामीण रस्ता पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर ते मुंबई रेल्वे मार्ग बंद आहे, तर एस. टी. महामंडळाकडील 20 मार्ग बंद आहेत.
शेतीपिकांचे नुकसान
शेतीपिकाचे नजरअंदाजे 117 गावातील 11 हजार 500 हेक्टर चे नुकसान झाले आहे.
महावितरणची 87 गावे बाधित
महावितरण विभागाकडील सांगली ग्रामीण - 19, इस्लामपूर - 63, विटा - 5 अशी एकूण 87 गावे बाधित आहेत. तर सांगली शहर - 1, सांगली ग्रामीण - 18, इस्लामपूर - 27, विटा - 6 अशी एकूण 52 गावे अंशतः बाधित आहेत. 76 हजार 920 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.
वैद्यकीय सुविधा
मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा या तालुक्यांतील पूरबाधित गावांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध देण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान
(कापूसखेड, ता. वाळवा) येथे भिंत पडून अबिदा बालेखान मुजावर (वय 55) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बहे (ता. वाळवा) येथील प्रतीक पोपट आवटे (वय 18) नदीपात्रात वाहून गेला असून, शोधमोहीम राबवली असता, मृतदेह अद्याप हाती लागला नाही.
1 जूनपासून आजअखेर 2 मोठी दुधाळ जनावरे मृत झाल्याने प्रत्येकी 30 हजार रुपयांची व लहान दुधाळ जनावरे मृत झाल्याने प्रत्येकी 3 हजार रुपयांची आर्थिक मदत लाभार्थींना देण्यात आली आहे. तसेच, ओढकाम करणारा बैल मृत झाल्याने संबंधित मालक लाभार्थीस 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या 49, अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 66, गोठ्यांची संख्या 7, सार्वजनिक मालमत्ता 1 याप्रमाणे नुकसान झाले आहे.
कोयना, वारणा, अलमट्टी धरण प्रशासनाशी समन्वय
सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, पलूस, वाळवा व शिराळा या तालुक्यांतील नदीकाठची एकूण 107 गावे पूरप्रवण असून, धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण - पाटबंधारे विभाग, वारणा धरण - पाटबंधारे विभाग, अलमट्टी धरण - प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी बेळगाव, विजापूर, अलमट्टी प्रशासन यांना अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 518 मीटर ते 518.50 मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
प्रशासनाची सज्जता
जिल्हा स्तरावर 24 नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. तसेच, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. तालुका नियंत्रण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित आहे. आपत्कालिन साहित्य, बोटी, लाईफ जॅकेटस्, लाईफ बॉयज्, फ्लोटिंग पंप, मेगा फोन, बी. ए. सेट, सेफ्टी हेल्मेटस्, टॉर्च हे साहित्य तालुका स्तरावर तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. पुरेशा औषध साठ्याबाबत तसेच साथीचे रोग पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) यांच्याकडील 14 रस्ते/पूल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (मिरज) यांच्याकडील 8 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पूरप्रवण गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास बाधित लोकांना जिल्हा परिषद, महापालिका शाळा आदि ठिकाणी सुरक्षित स्थळी तात्पुरत्या स्थलांतराचे नियोजन केले आहे.
आपत्कालिन परिस्थितीतील संपर्क क्रमांक
सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हा कक्ष २४ तास सुरू आहे. त्याचा संपर्क क्रमांक 09370333932 वर संपर्क साधता येईल. जिल्ह्यात पडणारा पाऊस व इतर अनुषंगिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. आपत्कालिन परिस्थितीत या क्रमांकावर संपर्क साधावा.
अफवा पसरवू नयेत
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.