सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:47 PM2024-07-25T13:47:14+5:302024-07-25T13:47:30+5:30

वारणा धरणातूनही विसर्ग वाढविला, ‘अलमट्टी’तून सव्वादोन लाख क्युसेक विसर्ग

Flood situation in Sangli, Krishna river level at 31 feet; Thousands of acres of crops along the river are under water | सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली

सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली

सांगली : कोयना, वारणा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. वारणा ८६ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून आठ हजार ८७४ क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. कोयना धरण ६७ टक्के भरले असून, तेथून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी वाढत असून, सांगली आर्यविन पूल येथे कृष्णेची पाणीपातळी ३१ फुटांवर गेल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदीकाठची हजारो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

वारणा धरण क्षेत्रातील शिराळा, वाळवा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच आहे. मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी व जत तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा धरणाचे दोन वक्राकार दरवाजे एक मीटरने, तर दोन दरवाजे ०.७५ मीटरने उघडले आहेत. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शिराळ्यातून शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटला आहे. नदीकाठावरील शेकडो एकर पिके, स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत.

कृष्णा नदीवरील बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटाला पाण्याचा विळखा पडला असून, बेटावर जाण्यासाठी असलेला मार्ग बंद झाला आहे. कृष्णा नदीची दिवसभरात तीन फुटांनी पाणीपातळी वाढली असून, सांगली आर्यविन येथे ३१ फुटांवर पाणीपातळी गेली आहे. यामुळे सांगली, मिरज शहरांतील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथील काही नाकरिकांना स्थलांतरित करण्यात आले.

कमळापुरात येरळा नदीचा पूल वाहतुकीसाठी बंद, दोन तालुक्यांचा संपर्क तुटला

संततधार पावसाने येरळा नदीला पूर आला आहे. खानापूर व कडेगाव या दोन तालुक्यांना जोडणारा कमळापूर येथील येरळा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने बुधवारी सकाळी विटा पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. पोलिस प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने खानापूर व कडेगाव या दोन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १७.४ मि.मी. पाऊस झाला असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : मिरज १४.१ (३६९), जत ४.७ (२६२.५), खानापूर १३.२ (२९८.३), वाळवा २६ (५६२.६), तासगाव १४.६ (३६४.८), शिराळा ४४.१ (७९७.२), आटपाडी १.७ (२३१.४), कवठेमहांकाळ ८.२ (३५३.४), पलूस १६.१ (३८७.२), कडेगाव २१.७ (३८२.२).

कृष्णा नदीची पाणीपातळी

  • पाणीपातळी (फूट- इंचामध्ये)
  • कराडचा कृष्णा पूल १८.५
  • बहे पूल १०.०३
  • ताकारी पूल ३१.०९
  • भिलवडी पूल ३२.०२
  • सांगली आर्यविन पूल ३१
  • राजापूर बंधारा ४४.०१
     

‘अलमट्टी’तून सव्वादोन लाख क्युसेक विसर्ग

अलमट्टी धरणात सध्या ९१.२६ टीएमसी पाणीसाठा असून धरण ७४ टक्के भरले आहे. धरणामध्ये एक लाख ७२ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. म्हणून कर्नाटक पाटबंधारे विभागाने बुधवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून दोन लाख २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सांगलीत दहा कुटुंबांचे स्थलांतर

सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये पुराचे पाणी शिरल्याने येथील एकूण १० कुटुंबांचे स्थलांतर महापालिकेने केले. ७ कुटुंबांतील २६ लोकांचे महापालिकेच्या निवारा केंद्रात पुनर्वसन केले असून अन्य तीन कुटुंबांनी नातेवाइकांकडे स्थलांतर केले आहे.

Web Title: Flood situation in Sangli, Krishna river level at 31 feet; Thousands of acres of crops along the river are under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.