कोरोना संकटानंतर ११७ गावांमध्ये महापुराची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:36+5:302021-06-09T04:32:36+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचे संकट जरा कमी होत असतानाच हवामान विभागाने मान्सूनचा दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ...

Flood threat in 117 villages after Corona crisis! | कोरोना संकटानंतर ११७ गावांमध्ये महापुराची धास्ती!

कोरोना संकटानंतर ११७ गावांमध्ये महापुराची धास्ती!

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचे संकट जरा कमी होत असतानाच हवामान विभागाने मान्सूनचा दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या ११७ गावांमधील लाखो ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मागील महापुराचा भीषण अनुभव लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांनी आतापासूनच सुरक्षित ठिकाणी पशुधनासह स्वत:ची राहण्याची व्यवस्था केली आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन कोरोनानंतर महापुराचे संकटावर मात करण्यासाठी सज्ज झाले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज शहरातील नदीकाठच्या नागरिकांना पुराचा धोका आहे. याशिवाय जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यातील ११७ गावांना पुराचा धोका आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यामधील नदीकाठच्या गावांना आत्ताच पुराचा धोका असल्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर लक्षात घेऊन आरोग्य विभागाची ८१ पथके सज्ज ठेवली आहेत. या पथकांकडे पुरेसा औषधसाठाही देण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने जामवाडी, कर्नाळ रस्ता, दत्तनगर, काकानगर, वखारभाग, गावभाग, हरिपूर रस्त्यासह मिरजेतील नदीकाठच्या घरातील नागरिकांना पूर येणार असून, सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.

चौकट

शहरात ३७९ धोकादायक इमारती

भिंतीला भेगा, छताचा भाग कोसळलेला तर कुठे संपूर्ण इमारतच धोकादायक बनलेली, तरीही जीवाची पर्वा न करता अशा धोकादायक इमारतीत लोक राहात आहेत. महापालिका क्षेत्रात तब्बल ३७९ धोकादायक इमारती असून, त्यात ८००हून अधिक लोक वास्तव्याला आहेत. या इमारतीच्या मालकांना महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतीत मात्र कोणीही वास्तव्यास नाही, ही एकमेव दिलासादायक बाब आहे. धोकादायक झाडे, त्यांच्या फांद्या कापण्याचे काम महापालिकेचा उद्यान विभाग करत आहे.

चौकट

जिल्ह्यातील ११७ गावांना पुराचा धोका

वारणा आणि कृष्णा नदीकाठावर सांगली, मिरज या दोन मोठ्या शहरांसह ११७ गावे असून, त्यांना महापुराचा धोका पोहोचू शकतो. महापालिकेने सांगली, मिरज शहरातील पुराचा धोका असलेल्या नागरिकांना आत्ताच स्थलांतराच्या नोटीस दिल्या आहेत. ११७ ग्रामपंचायतींमधील नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनाही पुराचा धोका राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

चौकट

प्रशासनाची काय तयारी?

- फायर फायटर : ७

- रेस्क्यू व्हॅन : १

- फायबर बोटी : ११

- लाईफ जॅकेट : १०००

- कटर : १०

कोट

पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना संभाव्य पूर लक्षात घेऊन स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पुराचा धोका लक्षात घेऊन फायर फायटर, रेस्क्यू व्हॅन, फायबर बोटी, लाईफ जॅकेट, आदी साहित्य आम्ही तयार ठेवले आहे. पुरापासून बचावाची रंगीत तालीमही आम्ही घेतली आहे. धोकादायक इमारतींबाबत संबंधितांना नोटीस दिल्या आहेत. तसेच धोकादायक झाडे तोडण्याबाबत संबंधित विभागाचे काम सुरु आहे.

- चिंतामणी कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

चौकट

पूर गावांमध्ये आरोग्य विभागाची ८१ पथके सज्ज

कोरोनाचे संकट जरा कमी झाले आहे, तोपर्यंत हवामान विभागाने मान्सूनचा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पूर येणार हे गृहित धरुन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पूरबाधित गावांमध्ये आरोग्य विभागाची ८१ पथके सज्ज ठेवली आहेत. या पथकांकडे पुरेसा औषधसाठाही ठेवला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.

Web Title: Flood threat in 117 villages after Corona crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.