तीळगंगा ओढ्याच्या पुराने रेठरे धरण परिसरात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:05+5:302021-07-25T04:23:05+5:30
रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तीळगंगा ओढ्याला पूर आल्याने ...
रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तीळगंगा ओढ्याला पूर आल्याने शेती, पिके व रस्त्यांच्या भरावाचे मोठे नुकसान झाले. गावातील सुमारे वीस घरांत पुराचे पाणी शिरले.
बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच रेठरे धरण व मरळनाथपूरच्या डोंगर परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तीळगंगा ओढ्याचे पात्र मोठ्याप्रमाणात विस्तारले. परिणामी बाजूच्या शेतातील ऊस व अन्य पिकामध्ये पाणी शिरुन माेठे नुकसान झाले. रेठरे धरण ते शिराळा मार्गावरील नवीन गावपुलावरून पहिल्यांदाच पाणी वाहिले. रेठरे धरण ते पेठ रस्त्यावरील लेंडुरी पूल, रेठरे धरण-माणिकवाडी रस्त्यावरील रामलिंग पुलावर सायंकाळी पाणी आले होते. यावेळी काहीकाळ वाहतूक बंद होती.
लेंडुरी पुलावरून पाणी वाहिल्याने पूल व रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. येथील रामोशी समाजाच्या घरात पाणी शिरले होते. गावातील मध्यवर्ती बँकेजवळील सुमारे दहा ते पंधरा घरांत पाणी शिरले. बागरान परिसरात जाणारा पूल पुराच्या पाण्यामुळे तुटून गेला. येथील शेतकरी संतोष महिंद यांचे सुमारे पंधरा गुंठे शेत तुटून गेले आहे, मानाजी धुमाळ, निवृत्ती धुमाळ, विश्वास धुमाळ यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. ओढ्यालगतचे लोखंडी पोल पावसामुळे वाहून गेले आहेत. प्रभाग चारमधील ओढ्यालगत असणारी स्मशानभूमी कोसळली. अनेक शेतकऱ्यांच्या गंज्या वाहून गेल्या आहेत.