चिकुर्डेत महापूरग्रस्त अद्याप मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:27+5:302021-03-26T04:25:27+5:30
चिकुर्डे ( ता. वाळवा ) येथील पूरग्रस्त व अतिवृष्टीने बेघर झालेले भोसले कुटुंबीय याच मोडकळीस आलेल्या शासकीय इमारतीत सध्या ...
चिकुर्डे ( ता. वाळवा ) येथील पूरग्रस्त व अतिवृष्टीने बेघर झालेले भोसले कुटुंबीय याच मोडकळीस आलेल्या शासकीय इमारतीत सध्या राहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथे २०१९ मध्ये आलेल्या महापूर व अतिवृष्टीत अनेक घरे उद्ध्वस्त झाली. शासनाने त्यावेळी तातडीने पंचनामा केला. परंतु दोन वर्षे उलटून गेली तरी त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. येथील पूर्णपणे बेघर झालेली दोन कुटुंबे मोडकळीस आलेल्या कृषी सहाय्यक कार्यालय इमारत व पाटबंधारे कार्यालय इमारतीमध्ये राहतात. वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरल्यासारखे ढिम्म आहे. तरी त्यांना तातडीने मदत मिळावी अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच कृष्णात पवार यांनी दिला.
२०१९ मध्ये आलेल्या महापूर व अतिवृष्टीमध्ये येथील सुमारे १२६ लोकांच्या घरांची पडझड झाली होती. तर ३० ते ३२ लोकांची घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. त्यावेळी प्रशासनाच्यावतीने बाधित घर मालकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे होऊन गेली तरी शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. पूर्णपणे घर जमीनदोस्त झालेल्या चंदू भोसले यांनी गावातील कृषी विभागाच्या मोडकळीस आलेल्या कार्यालयात तर बटू भोसले यांनी जीर्ण झालेल्या पाटबंधारे विभागाचे कार्यालयात आसरा घेतला आहे. मात्र, हा तात्पुरता आसरा किती दिवस असणार हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. याबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. शासनाने याची दखल घेऊन बाधितांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी कृष्णात पवार व ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट....
दोन वर्षे होऊन गेली तरी पूरग्रस्त व अतिवृष्टी बाधितांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. इतर गावातील लोकांना मदत मिळाली. मात्र, चिकुर्डे गावातील लोकांच्यावरच अन्याय का ?
कृष्णात पवार
माजी सरपंच, चिकुर्डे.