महापुराने आता मानसिक आरोग्यही ढासळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:16+5:302021-07-31T04:27:16+5:30
दुधगाव: मिरज पश्चिम भागात वारणा व कृष्णा नद्यांच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे संसार उन्मळून पडले आहेत; तर ...
दुधगाव: मिरज पश्चिम भागात वारणा व कृष्णा नद्यांच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे संसार उन्मळून पडले आहेत; तर पिके वाया गेल्याने आर्थिक फटकाही बसला आहे. या पुराने अनेकांना रोगांनीही ग्रासले आहे. यामुळे घरातील नागरिकांचे मानसिक आरोग्यही ढासळु लागले आहे.
महापुराच्या भीतीने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कर्जाचा डोंगर असताना पुराच्या पाण्यात घरेेेेे व व्यवसाय बुडाले. त्यामुळे अनेक जण तणावाखाली आहेत. घरातील प्रचंड नुकसान पाहून अनेक जण मानसिक दडपणात गेले आहेत.
महापुराने शेतीची अवस्था दैयनीय बनली आहेे. खरीप हंगामातील सोयाबिन भुईमूग पुराच्या पाण्यात कुजले आहे. ऊस भुईसपाट झाला आहे. पालेभाज्या शेतीचे तर प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांवर खर्च केला; पण तोही पूर्णपणे व्यर्थ गेला. आता कर्ज व व्याज कसे भरायचे, हा प्रश्न आहे.
चाैकट
महापुराने घर व शेेतीच्या नुकसानाबाबत असणारे निकष नाममात्र आहेेत. येणारी मदत एक एकर शेेतीची भांगलणीसाठी खर्च होणाऱ्या मजुरी इतकीसुद्धा नसते. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गत महापुरावेळी अधिकाऱ्याचे आडमुठे धोरण व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना फारशी मदत हाती लागली नाही. यामुळे यावेळीही तीच अनुभूती येणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.