मेणी ओढ्यावरील नऊ पुलांना पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:03+5:302021-07-26T04:25:03+5:30
कोकरुड : मेणी ओढ्यावर असणाऱ्या नऊ पुलांपैकी एक पूल वाहून गेला आहे. पाच पूल पूर्ण खचले आहेत, तर तीन ...
कोकरुड : मेणी ओढ्यावर असणाऱ्या नऊ पुलांपैकी एक पूल वाहून गेला आहे. पाच पूल पूर्ण खचले आहेत, तर तीन पुलांना धोका निर्माण झाला असून आटूगडेवाडी (मेणी) समतानगर, हत्तेगाव येथील लोकांना चार-पाच किलोमीटरवरून फिरून जावे लागत आहे.
यंदा या परिसरात पावसाने विक्रम केला आहे. चोवीस तासांत ५७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मेणी ओढ्यावर शिरसटवाडीपासून खुजगावपर्यंत एकूण नऊ पूल आहेत. त्यापैकी कोकरुड-कऱ्हाड मार्गावरील मेणी फाटा आणि खुजगाव हे पन्नास वर्षांपूर्वी बांधले असून अजून सुस्थितीत आहेत. पन्नास वर्षांच्या अलीकडे बांधलेल्या पुलांपैकी रांजणवाडी-आटूगडेवाडी (मेणी) हा पूल वाहून गेला आहे. सय्यदवाडी-गवळेवाडी दरम्यानचा जुना पूल मोडून पडला आहे. येळापूर-समतानगर दरम्यान एक वर्षांपूर्वी नव्याने बांधलेला पूल अर्धा वाहून गेला आहे. शेडगेवाडी-हत्तेगावमधील पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती, तसेच हत्तेगावच्या बाजूस असणाऱ्या दुसऱ्या ओढ्यावरही बंधारा उभारण्यात आला होता. मात्र, हे दोन्ही पूल वाहून गेले आहेत. येळापूर-आटूगडेवाडी पुलाची संरक्षण भिंत कोसळली आहे. बेंगडेवाडी, येळापूर (आटूगडेवाडी), खुजगाव येथील पुलांना धोका निर्माण झाला आहे. प्रथमच कोकरुड-कऱ्हाड रस्त्यावर असणाऱ्या मेणी फाटा पुलावरून पाणी गेल्याने या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. रांजणवाडी-आटूगडेवाडी, येळापूर-समतानगर, शेडगेवाडी-हत्तेगाव हे तीनही पूल वाहून गेल्याने नागरिकांना चार-पाच किलोमीटर अंतरावरून ये-जा करावी लागत आहे.