जलप्रलयाने सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त -: अब्जावधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 07:26 PM2019-08-13T19:26:38+5:302019-08-13T19:33:43+5:30

अवघ्या चार ते पाच दिवसांत होत्याचे नव्हते झाले असून, बाजारपेठेतील व्यापाºयांचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे.सांगली शहरात आलेल्या महापुरात मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ ही मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली.

Floods ravaged Sangli's market | जलप्रलयाने सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त -: अब्जावधीचे नुकसान

सांगलीतील हरभट रस्त्यावर पुराच्या पाण्याने वेढलेल्या दुकानांच्या साफसफाईचे काम मंगळवारी सुरू होते. नंदकिशोर वाघमारे

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापारी, छोट्या दुकानदारांच्या डोळ्यात अश्रू

सांगली : सणासुदीलाच नव्हे, तर इतर दिवशीही गर्दीने फुलणारी सांगलीची बाजारपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. मंगळवारी काही व्यापाऱ्यांनी दुकानाची दारे उघडली. दुकानात चिखल, पाण्याने भिजलेला माल पाहून काहींच्या डोळ्यात अश्रू आले. खिन्न चेहऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत, जड अंत:करणाने त्यांनी दुकानाची सफाई सुरू केली होती.

अवघ्या चार ते पाच दिवसांत होत्याचे नव्हते झाले असून, बाजारपेठेतील व्यापाºयांचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे.शहरात आलेल्या महापुरात मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ ही मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली. दुकाने चार ते पाच दिवस आठ ते दहा फूट पाण्यात होती. काही दुकाने तर संपूर्णत: पाण्याखाली गेली होती. पुराचा अंदाज न आल्याने व्यापाºयांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलविला नव्हता. एका दिवसात पुराचे पाणी इतके वाढले, की दुकानापर्यंतही व्यापाºयांना जाता आले नाही. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेकडे जाणारे रस्ते खुले झाले. त्यानंतर दुकानांची स्वच्छता व नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी व्यापाºयांची पावले बाजारपेठेकडे वळली. पण बाजारपेठेतील विदारक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. कुणाचे लाखात, तर कुणाचे कोटीत नुकसान झाले आहे. नुकसानीचा अंदाज येण्यास अजून बराच काळ जाईल. पण या महापुराने सांगलीची बाजारपेठ मात्र पूर्णत: उद्ध्वस्त केली आहे.

हरभट रोड
हरभट रोडवर पुराचे पाणी सात ते आठ फूट होते. या रस्त्यावर कपडे, भांडी, गारमेंट, रंग, तसेच सोन्या-चांदीची शंभराहून अधिक दुकाने आहेत. काही दुकानांना बेसमेंटही आहे. पुराचे पाणी शिरल्यानंतर काही व्यापारी, दुकानदारांनी माल चार ते पाच फुटावर ठेवला होता. पण आठ ते दहा फूट पाणी भरल्याने या दुकानातील सर्व माल भिजला आहे. दुकानदारांनी मंगळवारपासून स्वच्छता हाती घेतली आहे. भिजलेला माल रस्त्यावर आणून टाकला जात आहे. खराब झालेला माल कचºयात टाकण्यात येत होता. रंगाची सर्व पोती भिजल्याने तीही रस्त्यावर ठेवली होती.

कापडपेठ
कापड पेठेत प्रामुख्याने रेडिमेड व सुटिंग, शर्टिंगची दुकाने आहेत. दोनशेहून अधिक दुकाने या परिसरात आहेत. साडी, तयार कपडे, कापड, चादरी, लहान मुलांचे कपडे, पुस्तकाची दुकाने आहेत. दुकानदारांनी दुकान उघडल्यानंतर संपूर्ण माल भिजला होता. कापड पेठेतही आठ ते दहा फूट पाणी होते. काही दुकानदारांनी भिजलेले तयार कपडे, अंडरगारमेंट रस्त्यावर वाळत घातले होते. फर्निचर, संगणक पाण्यात भिजले आहेत. एका दुकानात तर काऊंटर पाण्याच्या दाबाने उखडले होते, तर काही दुकानात फर्निचर मोडून पडले होते. काचा फुटल्या होत्या. या परिसरात काही रहिवासी आहेत. त्यांच्या घरातही पाणी शिरले होते. कापड पेठेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

गणपती पेठ
गणपती पेठेत धान्य, कॉस्मेटिक, मसाले व इतर साहित्याची दीडशेहून अधिक दुकाने आहेत. पुरामध्ये सर्वात मोठे नुकसान गणपती पेठेचे झाले आहे. सणासुदीच्या निमित्ताने अनेक व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात दुकानात माल भरला होता. हा सारा माल पुरात भिजला आहे. गहू, ज्वारी, तांदळापासून ते अगदी मिठाच्या पोत्यापर्यंत सारे काही पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाले होते. काजू, खजूर, लवंग, दालचिनी, मिरी अशा मसाल्याच्या पदार्थांच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. कॉस्मेटिकचा दुकानातील माल रस्त्यावर पडला होता. पाण्यात भिजल्याने धान्य कुजण्यास सुरूवात झाली आहे. त्याची दुर्गंधी बाजारपेठेत पसरली होती. शेंगदाण्याला तर कोंब फुटले होते. इतकी बिकट स्थिती गणपती पेठेची झाली आहे. एकेका व्यापाºयाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सराफ कट्टा
सराफ कट्ट्यामध्ये पु. ना. गाडगीळ, आर. बी. भोसले, जोग ज्वेलर्स अशी अनेक प्रतिष्ठित व्यापाºयांची सोन्या-चांदीची दुकाने आहेत. सराफ बाजारातही सात ते आठ फूट पाणी होते. काही दुकाने बेसमेंटमध्ये आहेत. तिथे तर अद्यापही पाणी साचून आहे. दुकानातील काही सोन्या-चांदीचे दागिने पुराच्या पाण्यात भिजले. दागिने घालण्यासाठी तयार करण्यात आलेले प्लॅस्टिकचे डबेही पाण्यात गेले आहेत. दुकानातील कागदपत्रेही पाण्यात भिजली.

मारुती रोड
मारुती रोडवर किरकोळ विक्रेते व छोट्या दुकानदारांची संख्या अधिक आहे. चप्पल, कॉस्मेटिक, मिठाई, सायकल, चष्मे आदी दुकानांत पुराचे पाणी गेले होते. अद्यापही आनंद चित्रमंदिर ते मारुती चौक पाण्याखाली आहे. येथील दुकाने तर पूर्णत: पाण्यात बुडालेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतरच तेथील नुकसानीचा अंदाज येईल. आनंद चित्रमंदिर ते हरभट रोडपर्यंतच्या रस्त्यावर छोट्या विक्रेत्यांनी हातमोजे, अंडरगारमेंट साहित्य रस्त्यावर वाळत घातले होते. मिठाईच्या दुकानांतील सर्व माल खराब झाला होता. कॉस्मेटिकच्या दुकानांतील मालही रस्त्यावर काढून टाकला जात होता.

२००५ च्या अंदाजाने घात
सांगली शहराला २००५ मध्ये महापुराचा मोठा फटका बसला. या पुराच्या काळात बाजारपेठेत तीन ते चार फूट पाणी आले होते. काही दुकानांच्या पायरीला पाणी लागले, तर काहींच्या दुकानात फूट, दीड फूट पाणी होते. यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर बहुतांश व्यापाºयांनी २००५ च्या अंदाजावरच दुकानातील माल हलविला. तिथेच व्यापारी, दुकानदारांचा घात झाला. पुराची स्थिती इतकी बिकट झाली की, पाणी आठ ते दहा फुटापर्यंत गेले. त्यामुळे दुकानात काऊंटरवर अथवा तीन ते चार फूट उंचीवर ठेवलेला मालही पुराच्या पाण्यात भिजला. काहींना तर दुकानातील माल हलविण्याची संधीच पुराने दिली नाही.

नुकसानीची जबाबदारी कुणाची? : समीर शहा, अध्यक्ष, एकता व्यापारी असोसिएशन
सांगलीची बाजारपेठ आठवडाभर बंद होती. त्यात पुराने दुकानातील माल खराब झाला आहे. बाजारपेठ पूर्ववत होण्यास आणखी काही दिवस जातील. या साºयाचा हिशेब केला, तर बाजारपेठेचे दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जबाबदारी कुणाची? निसर्गाची की महाराष्ट्र, कर्नाटक सरकारची? सांगलीचा व्यापारी वीस वर्षे मागे गेला आहे. पुराच्या काळात व्हॅट व इतर कर, खर्च सुरूच होते. त्यामुळे आता व्यापाºयांना पुन्हा उभे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करणार? याबाबत शासनाने भूमिका जाहीर करण्याची गरज आहे.

सुदर्शन माने : व्यापारी, गणपती पेठ
गणपती पेठेत अनेक दुकानांतील धान्य व इतर साहित्य कुजले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेने तातडीने या परिसराच्या स्वच्छतेसाठी पावले उचलली पाहिजेत. त्यानंतर शासनाच्या मदतीची मोठी गरज आहे. अन्यथा व्यापारी उभा राहू शकणार नाही. आज अनेक व्यापारी डोक्याला हात लावून दुकानाबाहेर बसले आहेत. झालेले नुकसान कसे भरू काढायचे, याचीच चिंता व्यापाºयांना आहे. त्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळावे.

जीएसटी, इतर करात सवलत द्या : लक्ष्मीकांत सारडा, कापडपेठ
कापड पेठेतील व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यापाºयांना सरकारकडूनही मोठी मदत मिळणार नाही. व्यापाºयांचीही तशी अपेक्षा नाही. सांगलीतील व्यापाºयांना पूर्वपदावर येण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील. सरकारनेही जीएसटी, आयकर व इतर करात दोन वर्षाची सवलत देऊन व्यापाºयांना मदत करावी.


 

Web Title: Floods ravaged Sangli's market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.