महापूर येतच राहणार, पर्याय शोधावाच लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:11+5:302021-08-01T04:24:11+5:30
फोटो वापरणे इंट्रो महापुरातील नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीचे पुनर्वसन करायला हवे, अशी ...
फोटो वापरणे
इंट्रो
महापुरातील नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीचे पुनर्वसन करायला हवे, अशी सूचना मांडली. आपल्या खात्याच्या गरजेनुसार ते बोलले, पण सांगलीकरांच्या मनात यानिमित्ताने पुनर्वसनाचे बीज पेरले गेले. खरेच शक्य आहे का सांगलीचे पुनर्वसन? बाजारपेठा नव्याने वसवता येतील? मग सध्याच्या सांगलीचे काय? की आहे त्याच स्थितीत कमीत कमी नुकसानीसह महापुरासोबत जगणे शिकावे लागेल? महापुराने निर्माण केलेल्या या प्रश्नांच्या मोहोळावर तज्ज्ञांशी चर्चेअंती मिळालेल्या उत्तरांची मालिका...
संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात २००५ पासून तीनवेळा थैमान माजविलेल्या महापुराच्या नुकसानीचा एकत्रित आकडा २० हजार कोटींहून अधिक आहे. २०१९ च्या महापुरातील नुकसान तर खूपच होते. नागरिक बेसावध राहिले आणि कृष्णा-वारणेने तडाखा दिला. त्यातून सांगलीकर पुरते सावरण्यापूर्वीच यंदाच्या महापुराचा दणका बसला.
असे महापूर भविष्यातही येत राहणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपाय शोधण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्त सांगलीच्या पुनर्वसनाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. शंभर वर्षांत झाला नाही असा पाऊस झाल्यानेच पूर आला हे सांगून प्रशासन रिकामे होईल, पण तो यानंतरही पुन्हापुन्हा येणार हे तीन महापुरांनी दाखवून दिले आहे. १९१४ मध्ये पहिल्यांदा सांगली पुरात बुडाली, त्यानंतर पटवर्धन संस्थानिकांनी विश्रामगृह, दक्षिण व उत्तर शिवाजीनगरसह अनेक संस्था व वसाहती मूळच्या सांगलीबाहेर वसवल्या, त्याच्या अनुकरणाची वेळ आता पुन्हा आली आहे.
पुनर्वसन करायचेच तर कोठे आणि कोणाचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजवरचा अनुभव पाहता खुद्द प्रशासनानेच सर्व नियम आणि कायदेकानून धाब्यावर बसवत सांगलीचा विस्तार केला आहे. (क्रमश:)
चौकट
नोटिसांचा नैतिक अधिकार महापालिकेने गमावला
अवघ्या ३५ फूट पाणीपातळीला पाण्याखाली जाणाऱ्या शामरावनगर, काकानगर, दत्तनगर या वसाहतींना परवानगी देताना महापालिका प्रशासनाने पुराचा धोका लक्षात घेतला नव्हता काय, असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. शामरावनगर तर वर्षातील किमान सहा महिने पाण्यातच असते. पूरपट्ट्यातील हजारो बांधकामे अजूनही सुरुच आहेत. खुद्द आयुक्त बंगलाच जर नदीतील ४५ फूट पाणीपातळीला चोहोबाजूंनी पाण्यात जात असेल, तर अन्य सांगलीकरांना नोटिसा धाडण्याचा अधिकार महापालिकेला उरत नाही.
चौकट
हद्दवाढ हाच तूर्त पर्याय
हद्दवाढ केली नसल्याने सांगलीच्या विस्ताराला मर्यादा आहेत. दक्षिण व पश्चिमेला हातपाय पसरण्याचा प्रयत्न कृष्णा नदीने तीन महापुरांद्वारे हाणून पाडला आहे. पूर्वेला मिरज, कुपवाडकडे जागा शिल्लक नाही. उत्तरेला शेरीनाल्यातून महापूर शहरात घुसतो, त्यामुळे तेथील विस्तारावरही मर्यादा आहेत. या स्थितीत महापालिकेची हद्दवाढ करुन नव्याने शहराचा विस्तार हाच एकमेव मार्ग उरतो. माधवनगर, बुधगाव, कवलापूर, धामणी, बामणोली, सावळीपर्यंतचा विस्तारच महापुरातून सांगलीला वाचवेल.