इस्लामपुरात धार्मिक सलोख्याचे दर्शन; परशुराम, शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी video

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 01:24 PM2022-05-04T13:24:51+5:302022-05-04T13:47:23+5:30

आजच्या विष कालवणाऱ्या व्यवस्थेतही आम्ही सगळे बांधव एक आहोत हाच मानवतेचा आणि बंधुभावाचा महान संदेश सामाजिक आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या येथील मुस्लिम समाजाने दिला.

Flower showers from the mosque on the procession of Parshuram and Shiva Jayanti in Islampur | इस्लामपुरात धार्मिक सलोख्याचे दर्शन; परशुराम, शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी video

इस्लामपुरात धार्मिक सलोख्याचे दर्शन; परशुराम, शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी video

googlenewsNext

युनूस शेख

इस्लामपूर : भोंगे, हनुमान चालीसावरुन राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या भूमीत, धार्मिक सलोखा काय असतो, सदभावना कशी असते आणि भाईचाऱ्याची मुळं किती घट्ट आहे याचे दर्शन घडले. येथील सावकार मशिदीच्या मनोऱ्यावरून परशुराम जयंती आणि शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. आजच्या विष कालवणाऱ्या व्यवस्थेतही आम्ही सगळे बांधव एक आहोत हाच मानवतेचा आणि बंधुभावाचा महान संदेश सामाजिक आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या येथील मुस्लिम समाजाने दिला.

काल, मंगळवारचा दिवस हा तब्बल पाच समाजाचे पाच सण घेऊन अवतरला होता. त्यात रमजान ईद, शिवजयंती, परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया अशा सर्व मंगल आणि पवित्र सणांचा दिवस होता. मात्र राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न पुढे करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सण म्हटले की मिरवणूक, शोभायात्रा निघणारच. त्यामुळे या सर्वाचा ताण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होता. कोणाला कोणत्या मार्गावरून मिरवणुकीची परवानगी द्यायची, किती वेळ द्यायची अशा कैचीत पोलीस प्रशासन अडकले होते. मात्र सगळ्या मिरवणुका या दिलेल्या वेळेत आणि शांततेत संपन्न होतानाच या शहरातील एकोपा आणि सामंजस्यपणाचा अनुभवही यानिमित्ताने आला.

उरुण परिसरातील सावकार मशीद ही मानाची समजली जाते. येथील जेष्ठ हाजी सुफीसाहेब मोमीन-सावकार, हाजी बशीर मोमीन, जुन्या काळातील व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू ९६ वर्षांचे महंमदसाब मुल्ला, हाजी सिकंदर मोमीन-सावकार, अरीफशेठ मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही मिरवणुकांवर पुष्पवृष्टी केली. मिरवणुकीतील सर्वाना सरबत वाटप करून शुभेच्छा दिल्या. फजल मोमीन,अनिस मुल्ला, अब्रार खाटीक, नोमान बारस्कर, युसूफ खाटीक, मसूद मोमीन या शिलेदारांनी हा उपक्रम राबविला. शहरातील मुस्लिम समाजाने आज सर्व धर्मांप्रति औदार्याची दाखवत ईदच्या चाँदवर आणखी चार चाँद लावताना मानवतेची ही विन आणखी घट्ट करून ठेवली.

Web Title: Flower showers from the mosque on the procession of Parshuram and Shiva Jayanti in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.