जिल्ह्यात कृष्णा-वारणेच्या पातळीत चढ-उतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:02+5:302021-08-01T04:25:02+5:30
सांगली : कोयना, वारणा धरणातून विसर्ग वाढविल्यानंतरही सांगली जिल्ह्यात कृष्णा व वारणा धरणांच्या पाणीपातळीत अद्याप मोठी वाढ झालेली नाही. ...
सांगली : कोयना, वारणा धरणातून विसर्ग वाढविल्यानंतरही सांगली जिल्ह्यात कृष्णा व वारणा धरणांच्या पाणीपातळीत अद्याप मोठी वाढ झालेली नाही. काही ठिकाणी पाणीपातळी स्थिर असून काही ठिकाणी पाणीपातळी इंचाने चढ-उतार सुरू आहे. शनिवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३ ऑगस्टपर्यंत तुरळक पाऊस राहणार आहे.
धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही सध्या कमी आहे. तरीही धरणातून वाढविण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीपातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विसर्ग वाढविण्यात आला असला तरी अद्याप सांगली जिल्ह्यात दोन्ही नद्यांच्या पातळीत फारशी वाढ झालेली नाही. अलमट्टी धरणातून ४ लाख २१ हजार ८८२ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
कोयना धरणातून सध्या ४९ हजार ३२४, तर वारणा धरणातून १४ हजार ३८९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सांगलीतील नदीपातळी सध्या ३५.६ फूट इतकी आहे. कर्नाळ रस्त्यावर पाणी अद्याप थांबून आहे. धरणातून वाढविलेल्या विसर्गामुळे जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग नद्यांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.
चौकट
जिल्ह्यात ९ मिलीमीटर पाऊस
जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजता नोंदलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९.२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ३१.७ मिलीमीटर पाऊस शिराळ्यात नोंदला गेला आहे. मिरजेत ८.३, खानापूर-विटा येथे १.३ वाळवा-इस्लामपूरला १९.५ तासगावला २, आटपाडीत ०.२ कवठेमहांकाळला ०.३ पलूसला १२.७, कडेगावला ३.४ मिलीमीटर पाऊस झाला.
चौकट
कृष्णेची पाणी पातळी (फूट)
ठिकाण पहाटे ५ सायंकाळी ५
बहे ११ १०.६
ताकारी ३८.०२ ३७.१०
भिलवडी ३८ ३८.३
सांगली ३५.५ ३५.६
अंकली ४१.०३ ४१
म्हैसाळ ५१.०६ ५१
चौकट
सांगलीत एकाच दिवसात वाढ व घट
सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी शनिवारी पहाटे पाच वाजता ३५.५ फूट होती. सकाळी अकरापर्यंत त्यात दोन इंचाने वाढ होऊन पाणीपातळी ३५.७ फुटावर गेली. सायंकाळी पाचपर्यंत पुन्हा इंचाने घट होऊन पाणीपातळी ३५.६ फूट झाली.