फुलांच्या बाजारात मारामारी
By Admin | Published: September 25, 2014 10:37 PM2014-09-25T22:37:37+5:302014-09-25T23:27:29+5:30
मिरजेतील प्रकार : सुविधांअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
मिरज : जिल्ह्यात एकमेव असलेल्या मिरजेतील फुलांच्या बाजारात सोयी-सुविधा नसल्याने फूल उत्पादक शेतकरी व विक्रेते हैराण आहेत. पावसाने झालेल्या चिखलात फुलाचे पोते पडल्याच्या कारणावरून आज (बुधवारी) दोन शेतकऱ्यांत झालेल्या मारामारीमुळे फुलांच्या बाजारात तणाव निर्माण झाला होता.
मिरज पूर्व भागातील विविध गावांत गुलाब, झेंडू, निशिगंध, लिली या फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. फुलांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात असल्याने मिरजेत दररोज फुलांचा बाजार भरतो. पंढरपूर कोल्हापूरनंतर मिरजेतच फुलांचा बाजार भरत असल्याने कर्नाटक, कोकणसह सोलापूर जिल्ह्यातून फुले खरेदीसाठी व्यापारी मिरजेत येतात. मिरजेतील दुय्यम बाजार आवारात दररोज सकाळी भरणाऱ्या फूल बाजारासाठी मार्केट समिती व्यापाऱ्यांकडून भाडे आकारणी करते; मात्र आवश्यक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पावसाचे पाणी साचून बाजारात चिखल होतो. बाजाराच्या मोकळ्या जागेत चिखल होऊ नये यासाठी व्यवस्था करून पत्र्याचे शेड व रस्त्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे बाजार समितीचे दुर्लक्ष आहे. सध्या दसऱ्यासाठी झेंडू, निशिगंधा, लिली, गुलाब यांची लाखोची उलाढाल होत आहे.
मात्र बाजारात सुविधांअभावी विक्रेते व शेतकरी त्रस्त आहेत. बाजारात फुलांच्या पोत्याला धक्का लागून फुले चिखलात पडल्याच्या कारणावरून तानंग व मालगाव येथील दोन शेतकऱ्यांत हाणामारी झाली. बाजाराचा आखाडा झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी आंदोलन करणार असल्याचे नंदकुमार म्हेत्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)
कर्नाटकातून खरेदी
फुलांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात असल्याने मिरजेत दररोज फुलांचा बाजार भरतो. पंढरपूर, कोल्हापूरनंतर मिरजेतच फुलांचा बाजार भरत असल्याने कर्नाटक, कोकणसह सोलापूर जिल्ह्यातून फुले खरेदीसाठी व्यापारी येतात.