सामान्य माणूस साहित्याचा केंद्रबिंदू हवा - श्रीपाल सबनीस
By admin | Published: January 28, 2017 09:16 PM2017-01-28T21:16:12+5:302017-01-28T21:16:12+5:30
भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीपाल सबनीस यांनी केले.
Next
>
चरण (सांगली), दि. २८ - वेगवेगळ्या प्रकारचे जातीसमूह या देशात आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेतून चळवळी सुरू आहेत. भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी केले. पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्यावतीने आयोजित नवव्या डोंगरी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सबनीस म्हणाले की, अनेक प्रकारची संमेलने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात होत आहेत. अशा क्षेत्रीय संमेलनांचा इतिहास लिहिण्याची गरज आहे. साहित्यिकांनी दलित, आदिवासी, डोंगरी अशा संमेलनांमधून समतेचा विचार प्रस्थापित केला पाहिजे. याचबरोबर आपल्या महापुरुषांना जातीय चौकटीत न मांडता अखिल मानवजातीच्या पातळीवर त्यांचे विचार पोहोचविले पाहिजेत. संमेलनाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार जयंत पाटील म्हणाले की, साहित्यच माणसाला सुसंस्कृत बनविते. साहित्याच्या क्षेत्रातील माणसे आपल्या प्रतिभेने जगाच्या कानाकोपºयात पोहोचतात. साहित्यातून माणसाला विचार मिळतो, म्हणून साहित्यिकांना व साहित्य चळवळीला प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. समाज सर्वार्थाने पुढे न्यायचा असेल, तर साहित्यिकांची नितांत गरज आहे. यावेळी साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेस पन्नास हजार रुपये देणगी
देण्याचे पाटील यांनी जाहीर केले. माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, कवी प्रदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले. शब्दरंग साहित्य मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.
संमेलनास प्रा. शामराव पाटील, प्रा. डॉ. डी. जी. कणसे, पी. वाय. पाटील, सरपंच विजय विभुते, उपसरपंच अंकुश पाटील, मुख्याध्यापक अमृतकुमार पांढरे, शिवाजी पाटील, डी. वाय. ढेरे, मोहन पाटील, बाजीराव शेंडगे, मनोज चिंचोलकर, तानाजी पाटील उपस्थित होते. नारायण घोडे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)