साखरेचा उतारा वाढविण्यावर भर द्यावा -पी. आर. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:12 AM2018-04-18T01:12:14+5:302018-04-18T01:12:14+5:30
इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १ लाख २६ हजार मेट्रिक टन उसाचे जादा गाळप केले आहे
इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १ लाख २६ हजार मेट्रिक टन उसाचे जादा गाळप केले आहे. आमदार जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पुढच्यावर्षी आपण सर्वांनी या युनिटमध्ये ऊस गाळपात सातत्य ठेवताना साखर उतारा वाढविण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा राजारामबापू सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केली.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल शाखेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. प्रारंभी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामरावकाका पाटील यांच्याहस्ते सत्यनारायण पूजा करून, हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान केलेल्या तोडणी मजूर, मुकादम, कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कासेगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पाटील, ‘सोमेश्वर’चे माजी संचालक शंकरराव पाटील यांच्याहस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन केले.
पी. आर. पाटील म्हणाले, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून, यावर्षी ५ लाख ३२ हजार ५३० टन उसाचे गाळप केले आहे.
शामरावकाका पाटील म्हणाले, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांची दूरदृष्टी व अथक् परिश्रमातून वाटेगाव-सुरूल शाखा उभी राहिली आहे. या शाखेने सातत्याने सहकारी साखर कारखानदारीत आपले वेगळेपण जपलेले आहे. भविष्यातही या शाखेची यशस्वी घोडदौड कायम राहील.
यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण, चीफ केमिस्ट संभाजी सावंत, शेती अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह कंत्राटदार सुजित पाटील, संदीप पाटील, के. डी. शेळके,अशोक पाटील, तानाजी पाटील, शंकर पाटील, विश्वनाथ लाहीगडे आदींचा सत्कार करण्यात आला.
संचालक जे. वाय. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक आनंदराव पाटील यांनी आभार मानले. या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक दिलीपराव पाटील, दादासाहेब मोरे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
सरासरी साखर उतारा १२.६० टक्के
पी. आर. पाटील पुढे म्हणाले, आपण वाटेगाव-सुरूल शाखेत यावर्षी ५ लाख ३२ हजार ५३० टन उसाचे गाळप करून ६ लाख ७१ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतलेले आहे. यावर्षी १२.६० इतका सरासरी साखर उतारा मिळाला आहे. हा साखर उतारा वाढविण्यावर आपण भर द्यायला हवा. आपण यावर्षी या युनिटच्या सहविद्युत प्रकल्पातून २ कोटी १० लाख १९ हजार युनिट वीज महावितरण कंपनीस निर्यात केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ४१ लाख युनिट वीज जादा निर्यात केली आहे.