Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला 'घड्याळ' कोणाच्या हातात?; रोहित पाटील, प्रभाकर पाटलांच्या भूमिकेचे औत्सुक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 05:15 PM2024-02-08T17:15:24+5:302024-02-08T17:15:58+5:30
प्रभाकर पाटील घड्याळ बांधणार?
दत्ता पाटील
तासगाव : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा हक्क असल्याचा निर्णय झाला. त्यानंतर तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ कोणाच्या हातात असणार ? असा प्रश्न तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेस आला आहे. ‘भावी आमदार’ म्हणून सज्ज झालेले रोहित पाटील आणि भाजपचे प्रभाकर पाटील यांची वाटचाल काय असणार ? याबाबत देखील उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, आर. आर. पाटील आणि घड्याळ हे समीकरण विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर कायम राहिले. आर. आर. पाटील यांच्या पश्चात देखील मतदारसंघात घड्याळाचा गजर होत राहिला. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर आर. आर. आबांच्या कुटुंबीयांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला.
निवडणूक आयोगाच्या निकालात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे असल्याचा निर्णय झाला. त्यामुळे सद्य:स्थितीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात सुरू असलेला राष्ट्रवादी पुन्हा आणि घड्याळाचा गजर थांबणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी रोहित पाटील यांना निश्चित मानली जात आहे.
भाजपकडून खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीवर अद्याप मोहोर उमटलेली नाही. महायुतीच्या फॉर्म्युल्यात तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडला जाणार असल्याची चर्चा होत आहे. तसे झाल्यास पवार गटाकडून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार ? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. या मतदारसंघावर घड्याळाचा प्रभाव असल्यामुळे, या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहिला तर विधानसभेसाठी हे घड्याळ हातात कोण बांधणार ? याबाबत मतदारसंघात चर्चा होत आहे.
प्रभाकर पाटील घड्याळ बांधणार?
खासदार पुत्र प्रभाकर पाटील यांनी काही दिवसांपासून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बदलत्या राजकीय समीकरणे आणि घड्याळ चिन्हाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी भाजपचे प्रभाकर पाटील विधानसभेसाठी हातात घड्याळ बांधणार का? अशीही चर्चा मतदारसंघात होताना दिसून येत आहे.