चारा छावण्या प्रस्तावांची तासगाव तालुक्यात वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:46 PM2019-05-31T22:46:52+5:302019-05-31T22:47:47+5:30
तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण जाहीर केले असले तरी
दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण जाहीर केले असले तरी, जुन्या अनुभवामुळे, नव्याने चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे चारा छावण्यांचे धोरणच घातक ठरले असून जनावरांची उपासमार होत आहे.
गेल्यावर्षीचा अपुरा पाऊस, वाया गेलेला रब्बी हंगाम आणि जोडीला पाचवीला पूजलेली पाणीटंचाई यामुळे तासगाव तालुक्यात ओल्या आणि सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. चाºयाअभावी जनावरांची उपासमार सुरू झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. चाराटंचाईची परिस्थिती या पुढेही अशीच राहिली, तर जनावरे कसायाला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यावर मात करण्यासाठी तातडीने चारा डेपो किंंवा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.
२०१२ च्या पशुगणनेनुसार तालुक्यात सुमारे २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. यामध्ये लहान जनावरे, मोठी जनावरे, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुटचा समावेश आहे. तालुक्यातील सुका चारा संपलेला आहे. पाणीटंचाईमुळे ओला चारा तयार होत नाही. जनावरांना एकवेळच्या चाºयासाठी शेतकºयांना धावाधाव करावी लागत आहे. दुष्काळाने शेतकरी भिकेकंगाल झाला आहे. जनावरांसाठी ओला चारा उपलब्ध नाही, तर सुका चारा संपला आहे.
शासनाने मागणी येईल तिथे चारा छावणी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरु करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. मात्र यापूर्वी छावण्या चालविलेल्या अनेक संस्थांवर अनियमिततेचा ठपका ठेवून गुन्हे दाखल झाले आहेत. या जुन्या अनुभवामुळे नव्याने छावण्या सुरू करण्यास संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे शासनाची मंजुरी, पशुपालक शेतकºयांची मागणी असूनदेखील छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तालुक्यात दोन दिवसांपूर्वी डोंगरसोनी येथे एका विकास सोसायटीने पुढाकार घेऊन छावणी सुरू केली आहे. मात्र याव्यतिरिक्त एकही प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला नाही. त्यामुळे जनावरांची उपासमार आणि चारा छावण्यांचे धोरणच निरूपयोगी, अशीच काहीशी अवस्था झाली आहे.
छावणी नको : डेपो द्या
चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाची प्रक्रिया किचकट आहे. चारा छावण्या चालवणेदेखील जिकिरीचे काम आहे. त्यामुळे बहुतांश संस्थांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे चारा छावण्यांऐवजी तातडीने चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील पशुधन
गाय ३२२८१
म्हैस ६५३३३
शेळी ३०४६०
मेंढी ९२७६
कुक्कुट १०१४९६
एकूण २३८८४६