Sangli: जत तालुक्यात चारा प्रश्न गंभीर, दूध उत्पादनात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:42 PM2024-04-25T16:42:43+5:302024-04-25T16:42:59+5:30
दुष्काळाच्या झळा वाढल्या, पशुपालक धास्तावल्याचे चित्र
दरीबडची : जत तालुक्यात उन्हाच्या वाढत्या कडाक्याने दुभती जनावरे धापा टाकू लागले आहेत. उष्मांकाच्या झटक्याने दुभत्या म्हशी, गाई जायबंदी होत आहेत. नवजात रेडके,वासरे दगावू लागली आहेत. अशक्त जन्माला येऊ लागले आहेत. दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. गाभण म्हैशीचे हाल होत आहेत. पशुपालक धास्तावल्याचे चित्र आहे. पाणी आणि चारा टंचाईने दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे.
खिलार जनावरांसाठी व माडग्याळ मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. कोरडवाहू जमीन, डोंगराळ भाग, पडीक जमिनीचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांचे पालन करणे सुलभ आहे. तालुक्यात गाई-बैल ७० हजार ९१६, म्हैशी ७० हजार ५८ शेळ्या ४५ हजार ९६४ मेंढ्या १ लाख ६२ हजार ८७७ अशी एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ जनावरे आहेत.
तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान वाढले आहे. वाढत्या तापमानाचा झटका दुभत्या म्हशी गाई जनावरांना जीवघेणा ठरू लागला आहे. दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. संकलनात घट झाली आहे. दूध डेअरीतून ग्राहकांना ५० ते ६० रुपये लिटरने दुधाची विक्री होत आहे.
अनेक आजारांची लागण
उन्हाळ्यामुळे जनावरांच्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होणे, ताप येणे, अपचन होणे, लाळ खुरकत येणे आजारांची लागण होत आहे. यातून जनावरांच्या जीविताला धोका पोहोचू लागला आहे.
गर्भपाताचे मोठे संकट
वाढत्या तापमानामुळे जनावरावर गर्भपाताचे महासंकट उभा राहिले आहे. दिवस न भरताच गर्भपात होत आहेत. वांझ प्रमाणात वाढ झाली आहे.पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष आहे.
या उपाययोजना कराव्यात
- जनावरांना सावलीत बांधावे.
- दिवसातून स्वच्छ पाणी चार ते पाच वेळा पाजावे.
- सावलीसाठी शेड नेट उभारावा. त्याच्या सभोवती वातावरणात थंडावा रहाण्यासाठी भिजवून पोती बांधावेत..
- डिहायड्रेशन होऊ नये म्हणून कॅल्शियम पावडर व ओरल ५० ते १०० ग्रॅम चारातून द्यावा.
- एक वेळा ओला चारा द्यावा. सुका एक वेळ द्यावा
‘वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी जनावरे सावलीत बांधावेत. जादा पाणी पाजावे. कॅल्शियम आहारातून द्यावेत. पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी.’ - डाॅ कुणाल कांबळे, तालुका पशुसंर्वधन विस्तार अधिकारी जत