तमाशातला राजा विकतोय भेंडी आणि महाराणीच्या नशिबात कांदे-बटाटे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:27 PM2021-08-17T12:27:15+5:302021-08-17T12:44:49+5:30
Folk artist facing financial problems : मानधन मिळविणाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य कलाकारांची शासन दरबारी नोंद नाही. शिवाय कलावंत कोणाला म्हणायचे याचीही नेमकी व्याख्या शासनाकडे नाही.
संतोष भिसे
सांगली - टाळेबंदीने लोककलावंतांच्या आयुष्याची फरपट केली आहे. आयुष्यात कधी नव्हे ते प्रथमच इतके वाईट दिवस पहावे लागत असल्याची व्यथा कलाकारांनी मांडली. शासनाने त्यांच्यासाठी पाच हजार रुपये मदतीची घोषणा केली असली तरी त्याविषयीदेखील स्पष्टता नाही. मानधन मिळविणाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य कलाकारांची शासन दरबारी नोंद नाही. शिवाय कलावंत कोणाला म्हणायचे याचीही नेमकी व्याख्या शासनाकडे नाही. त्यामुळे पाच हजारांची शासनाने जाहीर केलेली मदत म्हणजे बिरबलाची खिचडी ठरणार आहे. मदतीविषयी नेमका अध्यादेश अद्याप निघालेला नसल्याने संभ्रमावस्था आहे. जिल्हास्तरावरही अद्याप निश्चित माहिती प्रशासनाला नाही.
सरकारी मदतीकडे डोळे
- प्रत्येक कलावंतासाठी शासनाने पाच हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
- जिल्हास्तरावर सर्वच कलावंतांची नोंद प्रशासनाकडे नाही, त्यामुळे सर्वांनाच मदत मिळण्याची शक्यता नाही.
- तमाशा कलावंतांची नोंद फड मालकाकडे असली तरी वासुदेव, पोतराज यासह जलसा कलाकारांना मदत मिळणार का? हा प्रश्न आहे.
मानधन थोडे, सोंगेच फार
- कोरोना काळात अनेक कलावंतांकडून शासनाने कोरोनाविषयक जनजागृतीचे कार्यक्रम करुन घेतले आहेत.
- नव्याने मानधन देतानाही कार्यक्रमांची अपेक्षा ठेवली जाऊ शकते, त्यामुळे मिळणारी मदत मानधनापोटीच खर्ची पडू शकते.
- जनजागृतीचे कार्यक्रम करणाऱ्यांची यादी माहिती कार्यालयाकडे आहे, इतरांचा शोध कसा घेणार, याचीही उत्सुकता असेल.
जिल्ह्यात मानधन घेणारे २६०० कलाकार
- शासनाचे कलावंत मानधन घेणारे २६०० कलाकार शासनाकडे नोंद आहेत.
- अन्य कलावंतांची अधिृकत नोंद नाही, पण किमान दहा हजारांहून अधिक कलावंत असल्याचा अंदाज आहे.
- कोरोना संकटाला संधी मानून कलावंतांची मोजदाद व नोंदणी शासनाने करावी असा सूर कलाक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
कोट
कलाक्षेत्र विस्कटले, नवी माणसे आणायची कोठून?
उपासमारीमुळे अनेक कलावंतांनी कलाक्षेत्राला रामराम ठोकला आहे. कोरोना संपल्यावर कार्यक्रमांसाठी नवे कलाकार आणायचे कोठून? सध्या कलाकार परस्परांना मदत करत दिवस कंठत आहेत.
- भास्कर सदाकळे, अध्यक्ष, उमा-बाबा हंगामी तमाशा कलाकार संघटना
आयुष्यभर बोर्डावरच काम केल्याने अन्य कोणतेही काम जमत नाही. फडातील कलाकार भाजीपाला विकून पोट भरताहेत. संकटकाळात शासनानेही पाठ फिरवली. उधार-उसनवार करण्याची क्षमताही संपली आहे.
- शामराव कांबळे, कलावंत, सावळज
चार घरची धुणी-भांडी करुन पोट भरण्याची वेळ आली आहे. आयुष्यात इतके वाईट दिवस कधीच अनुभवले नव्हते. कोरोनामुळे समाजही संकटात आहे, त्यामुळे मदत मागायची कोणाकडे? आता शासनानेच मदत करायला हवी.
- सीताबाई लोंढे, कलावंत, दहीवडी (ता. तासगाव)