उरूसातून लोकनाट्य तमाशा नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:15 AM2019-11-23T00:15:19+5:302019-11-23T00:15:26+5:30
जितेंद्र येवले । इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद ...
जितेंद्र येवले ।
इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद झाली आहेत. त्यामुळे रसिकांचा हिरमोड होत आहे. बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनालाही उतरती कळा आली आहे.
इस्लामपूर शहराचे वैशिष्ट्य ठरलेला उरूस कार्तिक पौर्णिमेपासून २० दिवस भरतो. तो शहराचे सांस्कृतिक संचित आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून उरुसानिमित्त येणारी लोकनाट्य तमाशा मंडळे बंद झाली आहेत. पूर्वी जनावरांच्या बाजारानजीकच्या ख्रिश्चन बंगला परिसरातील विस्तीर्ण आवारात ठेकेदार सिध्दू पाटील, प्रताप पाटील, पडवळे नामवंत तमाशा मंडळे रसिकांसाठी आणत. त्यामध्ये मंगला बनसोडे, काळू-बाळू, दत्ता महाडिक-पुणेकर, गुलाबराव बोरगावकर, संध्या करवडीकर या नामवंत कलाकारांच्या फडांचा समावेश असे. परंतु अलीकडील काही वर्षात गावगुंडांचा त्रास, सुरक्षेचा प्रश्न, अपुरी जागा यामुळे हा तमाशाच उरूसातून नामशेष झाला आहे. २००५ मधील उरूसावेळी तमाशांचे तंबू जवळजवळच उभारण्यात आले होते. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दोन तंबूंमधील कनात काढून सवाल-जवाब हा कलाप्रकार रात्रीच्या खेळावेळी सादर होत होते.
बाजार समितीच्या माध्यमातून जनावरांचा बाजार भरविण्यासह स्पर्धेचेही नियोजन करण्यात येते. परंतु येथे येणाºया जनावरांची संख्या घटत चालली आहे. २0१५ मध्ये २६३0, २0१६ मध्ये २२00, २0१७ मध्ये १६00, २0१८ मध्ये १४00, २0१८ मध्ये ११८0, तर यावर्षी २0१९ मध्ये तर केवळ ६२0 जनावरे बाजारात दाखल झाली आहेत. जनावरांच्या बाजारात पुरविण्यात येणाºया सोयी-सुविधा, स्पर्धा यावरील खर्च पाहता, बाजार समितीला तोटाच सहन करावा लागत आहे. प्रत्येकवर्षी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत आहे. यावर्षीचा खर्च ७0 हजार आणि उत्पन्न ४0 हजारांचे मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव यांनी स्पष्ट केले.
कुस्ती मैदानही बंद
उरूसानिमित्त पेठ-इस्लामपूर रोडवरील सुरेश ढाब्यासमोरील मोकळ्या जागेत कुस्ती मैदान भरवले जात होते. नामवंत मल्लांच्या कुस्त्या येथे खेळवल्या जात होत्या. परंतु हे कुस्ती मैदानही १९९० पासून बंद पडले आहे.