निर्बंध पाळा; अन्यथा जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:29+5:302021-04-16T04:27:29+5:30
सांगली : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन नियोजन करीत असले तरी आता नागरिकांनीच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कोरोनाची ...
सांगली : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन नियोजन करीत असले तरी आता नागरिकांनीच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन स्वयंशिस्त न पाळल्यास पुढील १० दिवसांत जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण होणार असून, यंत्रणा प्रयत्नशील असली तरी नागरिकांनी स्वत:हून अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती व प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, या गंभीर स्थितीचे कोणतेही गांभीर्य जनतेत दिसून येत नाही. शासनाने लागू केलेले निर्बंध जनतेच्या भल्यासाठीच असताना, विनाकारण गर्दी केली जात आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्राधान्याने नियोजन करीत आहे. मात्र, प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेनेही सहकार्य करावे.
येत्या १० दिवसांत नियमांचे पालन न झाल्यास गेल्या वर्षीपेक्षा गंभीर स्थिती निर्माण हाेऊ शकते. गेल्या वर्षी बाराशेच्या वर रुग्ण आढळले होते. मात्र, आता येत्या दहा दिवसांत हा आकडाही पार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असली तरी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोनाच्या स्थितीवर मात करता येणार आहे.
चौकट
बाहेर फिरणारेच अधिक वाहक
प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असतानाही अनेकजण त्यांचे पालन न करता विनाकारण बाहेर फिरत आहेत. कारवाईसाठीही मर्यादा असल्या तरी आता प्रत्येकाने स्थितीचे भान ठेवून वर्तन ठेवावे. विनाकारण बाहेर फिरणारेच कोरोनाचे वाहक होण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचेही ते म्हणाले.