स्वयंशिस्त पाळा, अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 04:34 PM2020-07-17T16:34:48+5:302020-07-17T16:40:37+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही लोकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक बनले आहे. मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला ठेवल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही लोकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक बनले आहे. मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला ठेवल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.
कोरोना उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला ठेवला आहे. त्यामुळे हा पर्याय अंमलात आणू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य करावे. बँका, बेकरी, इतर दुकानदारांकडे होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देताना पीपीई कीट व अन्य संरक्षक सामग्रीचा वापर करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वत:चे थर्मामीटर, पल्स आॅक्सिमीटर घेऊन तपासणी करावी. आॅक्सिजनची पातळी ९२ च्या खाली आल्यास त्वरित आरोग्य तपासणी करून घ्यावी.
मिरजेच्या कोविड रूग्णालयातील अतिदक्षता विभागात बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे, तर भारती हॉस्पिटल येथेही क्षमता वाढविण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेशी संलग्नित असणारी खासगी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयेही उपचारासाठी घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता काही दिवसात विविध सण, उत्सव येत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही, लोक जमा होणार नाहीत, याबाबत स्पष्ट आदेश देण्यात येणार आहेत. कोरोनासंदर्भात अफवा पसरविणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून अफवा पसरवू नयेत, अन्यथा कडक कारवाई क रण्यात येणार आहे.