सांगली जिल्ह्यात दुध भेसळ करणाऱ्यांवर ‘अन्न व औषध’ची कारवाई, खानापुरात संकलन केंद्र केले सील
By शरद जाधव | Published: April 12, 2023 05:47 PM2023-04-12T17:47:27+5:302023-04-12T17:47:41+5:30
सोयाबीन तेल, पावडरचा साठा जप्त
सांगली : दुधात भेसळ करून त्याची विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यातील दुध संकलन केंद्राची तपासणी करत भेसळीसाठीचा माल जप्त करण्यात आला आहे.
खानापूर येथील अनिल माने यांचे दुध संकलन केंद्र आहे. याठिकाणी दुधात भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने जावून तपासणी केली त्यात माने यांच्या घरी व गोदामात दुधामध्ये भेसळीकरीता वापरले जाणारे २५ हजार ६६५ रूपये किंमतीचे १५० किलो सोयाबीन तेल, ९ हजार ८०० रुपये किंमतीची डेअरी परमिएट पावडर, ५ हजार ४५० रूपयांचे सोल्युशन, गाय दुध ८८ लिटर, म्हैस दुध ८०० लिटर असा साठा आढळला. त्यानुसार माने यांचे दुध संकलन केंद्र व गोदाम सील करण्यात आले आहे.
माने यांना तेल पुरविणाऱ्या खानापूर येथील उदयकुमार रामलिंग कोरे या दुकानावरही कारवाईत करत ४६ हजार १९५ रूपये किंमतीचा २८३ किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. माने संकलन केलेले दूध निमणी (ता. तासगाव) येथील मिल्क शाईन फुडस प्रा. लि. या शीतकरण केंद्रात विक्री करत असल्याने पथकाने त्याठिकाणीही जावून नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.