स्वामी समर्थ ट्रस्टकडून जतच्या कोविड सेंटरला अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:02+5:302021-06-02T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत येथील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत येथील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अखंडित वीस दिवस मोफत अन्नदान सुरू होते. मंगळवारी या अन्नदानाच्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
जत तालुक्यातील कोविड रुग्णांना रुग्णालयात जेवणाची व्यवस्था श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २० दिवसांपासून केली आहे. रुग्णांचे नातेवाईक हे रुग्णांच्या काळजीपोटी कोविड सेंटरच्या बाहेर झाडाच्या आडोशाला बसलेले दिसून येतात.
सध्या लाॅकडाऊन असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची जेवणाची गैरसोई सुरू असल्याने आ. विक्रम सावंत यांनी जतमधील सामाजिक संस्था व संघटनांना कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्नदान सेवा सुरू करण्याचे आवाहन केले होते.
त्या आवाहनानुसार श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दीपक पाटणकर, सदाशिव जाधव, गणेश पवार, संतोष तोरणे, राहुल व्हसमाळे आदींनी कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना एकोणीस दिवस मोफत अन्नदान व पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला आहे.
ट्रस्टने चौकाचौकात उभे राहून बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना अन्नदान व पिण्याचे पाणी पुरविले आहे.
अन्नदानाचा समारोप असल्याने खिचडी व जिलेबीचे वाटप नातेवाइकांना करण्यात आले आहे. ट्रस्टने सुरू केलेल्या उपक्रमाला समाजातून चांगले सहकार्य व पाठिंबा मिळाला आहे.