कौतुकास्पद! शेकडो वर्षांपासून सांगलीतील पाडळीकरांनी जोपासला धार्मिक सलोखा; मंदिर, मशिदीतही एकजूट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 05:33 PM2024-01-06T17:33:58+5:302024-01-06T18:09:04+5:30
स्मशानभूमी, दफनभूमी एकाच जागेत; ३५ वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा
दत्ता पाटील
तासगाव : ‘घरापासुनी स्मशान इतुका प्रवास हा होता’ या ओळीप्रमाणेच माणसाचं जगणं. मात्र, या प्रवासात अनेक जाती-धर्मांच्या भिंती उभा करून माणसातील माणूसपण हरवत चालल्याची अनेक उदाहरणे पावला पावलावर दिसतात. याला छेद देत माणुसकी हाच धर्म आचरणात आणून वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणारे गाव म्हणून तासगाव तालुक्यातील पाडळी गावाने एक वेगळी ओळख शेकडो वर्षांपासून जोपासली आहे. वर्षानुवर्षे हिंदू समाजाची स्मशानभूमी आणि मुस्लिम समाजाची दफनभूमी एकाच जागेत आहे. मंदिर, मशिदीच्या उभारणीसाठीदेखील गावाने एकजूट दाखविली आहे.
तासगाव तालुक्याच्या उत्तरेच्या टोकाला खानापूर तालुक्याच्या हद्दीलगत डोंगराच्या पायथ्याशी हजार बाराशे लोकसंख्या असलेले पाडली गाव. दुष्काळी परिस्थितीमुळे येथील बहुतांश लाेक गलाई व्यवसायानिमित्त देशभरात विखुरलेले आहेत. काही बांधव नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक आहेत.
या पाडळीकरांच्या एकजुटीचा प्रवास केवळ घरापुरताच मर्यादित नाही, तर घरापासून स्मशानभूमीपर्यंत हा एकोपा दिसून येतो. बाराशे-पंधराशे लोकवस्तीच्या या गावात सगळ्याच जाती-धर्मासाठी एकच स्मशानभूमी, हे या गावचं वेगळं वैशिष्ट. दहा गुंठे जागेत हिंदू समाजासाठीची स्मशानभूमी आणि मुस्लिम समाजासाठीची दफनभूमी एकाच ठिकाणी आहे. धार्मिक सलोखा जोपासत या गावाने धर्माची भिंत उभी न करता, माणुसकीचे नाते निर्माण करून गुण्यागोविंदाने राहता येते, याची प्रचिती यानिमित्ताने दिली आहे. ही परंपरा इथले गावकरी वर्षानुवर्षे जोपासत आले आहेत.
मंदिर, मशिदीतही एकजूट
पाडळीत आठ ते दहा कुटुंब मुस्लिम समाजाची आहेत, तर काही कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून अन्य गावांत स्थायिक झालेली आहेत. मात्र, मंदिर आणि मशीद उभारणीतदेखील गावाने एकजूट ठेवली आहे. आठ-दहा मुस्लिम बांधवांच्या कुटुंबासाठी सगळ्या गावाने एकत्रित येत दहा वर्षांपूर्वी मशिदीची उभारणी केली. सध्या गावात ग्रामदैवताचे मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या कार्यातही मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे खारीचा वाटा उचलून सलोखा जोपासला आहे.
पाडळीने वर्षानुवर्षे सामाजिक, धार्मिक सलोखा जोपासत ठेवलेला आदर्श आमच्यासाठी भूषणावह आहे. हीच परंपरा यापुढेदेखील अशीच अबाधित राहणार आहे. गावात गेल्या ३५ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ या सार्वजनिक उत्सवाची परंपरा निर्माण केली आहे. त्याचा पाडळीकरांना सार्थ अभिमान आहे. - ज्ञानेश्वर पाटील, पोलिस पाटील, पाडळी