Sangli: तासगावच्या राजकीय संघर्षात आटताहेत पाणी योजनांचे पाट, दिखाव्याच्या राजकारणामुळे झाला खेळखंडोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:42 PM2024-05-27T17:42:28+5:302024-05-27T17:54:36+5:30
शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचे विदारक वास्तव
दत्ता पाटील
तासगाव : प्रस्थापित नेते आणि त्यांच्या भावी पिढीच्या राजकीय सोयीसाठी तासगाव तालुक्यात श्रेयवादाचा संघर्ष पेटला आहे. नेत्यांच्या दिखाव्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील पाणी योजनांचा खेळखंडोबा झाला आहे. या राजकीय संघर्षात तालुक्यातील शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचे विदारक वास्तव दिसत आहे.
एकेकाळी सधन समजल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्याला गेल्या काही वर्षांत दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. वर्षानुवर्ष पाणी योजनांचे गाजर दाखवून निवडणुका लढवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता श्रेयवादाचे राजकारण सुरू केल्याचे दिसते. तालुक्यात पाणी योजनांचे जाळे विणलेले असले, तरी या योजनांचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. नियोजनाअभावी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या पाणी योजना कुचकामी ठरलेल्या आहेत.
त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत द्राक्ष बागायतदारांवर बागा काढून टाकण्याची वेळ यावर्षी आली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचे चित्र यापेक्षा विदारक आहे. जनतेने पाण्यासाठी टाहो फोडलेला असताना, तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र श्रेयवाद घेण्यासाठी संघर्ष करताहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यात टंचाईची दाहकता आहे. याकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेतृत्वाने सोयीस्कर दुर्लक्ष केले. केवळ निवेदनाचे कागदी घोडे नाचवायचे, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि त्याचा सोशल मीडियावर डांगोरा पिटायचा, असा एककलमी कार्यक्रम तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि भाजप, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहे.
तालुक्यात पाण्यासाठी वाताहात होत असल्याने शेतकरी स्वतःहून रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. अशा परिस्थितीत मिळणाऱ्या पाण्याचे श्रेय लाटण्याचा उद्योग लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.
वास्तविक शेतकऱ्यांऐवजी लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरणे अपेक्षित असताना केवळ श्रेयवादाचा ढोल पिटण्यात धन्यता मानली जात आहे. आमदारकी मिळवण्यासाठी केलेल्या कामाच्या श्रेयवादासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) युवा नेत्यात संघर्षाचा खेळ सुरू आहे. यात तालुक्यातील जनतेची मात्र होरपळ होत आहे.
श्रेयवाद नको, पाणी हवे
तालुक्यात पाणी योजनांचे जाळे आहे. मात्र, या योजनातून पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. या योजना कुचकामी ठरलेल्या आहेत. शेजारील पलूस-कडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी रस्त्यावरची लढाई लढून पाणी मिळवले. मात्र, तासगाव तालुक्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या वारसदारांनी रस्त्यावरच्या लढाई ऐवजी, श्रेयवादाचीच लढाई लढण्यास सुरू केली. त्यामुळे पाण्याचा संघर्ष कायम आहे.