Sangli: ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू कारखान्याच्या गव्हाणीत मारल्या उड्या

By अशोक डोंबाळे | Published: December 1, 2023 03:22 PM2023-12-01T15:22:42+5:302023-12-01T15:24:31+5:30

राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांची गर्दी : मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

For that price demand Workers of Swabhimani along with Raju Shetty protest against Rajarambapu factory | Sangli: ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू कारखान्याच्या गव्हाणीत मारल्या उड्या

Sangli: ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू कारखान्याच्या गव्हाणीत मारल्या उड्या

सांगली : कोल्हापूर पॅटर्ननुसार सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताब्यातील साखराळे (ता. वाळवा) येथील राजारामबापू साखर कारखान्याच्या गव्हाणीत शुक्रवारी उड्या मारल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी आंदोलनात सहभागी आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी असल्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रुपये जादा द्यायचे आहेत. तसेच तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये दर देण्याचे ठरले आहे; तसेच चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन तीन हजार १०० रुपये दर निश्चित झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या या पॅटर्ननुसार सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दर द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खा. शेट्टी यांनी मागणी केली आहे. ही मागणी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी फेटाळली आहे. 

म्हणूनच राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन जयंत पाटील यांच्या कारखान्यावर आंदोलन करण्याची घोषणा चार दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सर्व कार्यकर्ते साखराळे येथील राजारामबापू पाटील कारखान्यावर एकत्र झाले. काही कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून प्रशासनाचा निषेध केला; तसेच कोल्हापूर पॅटर्ननुसार दर मिळाला पाहिजे, अशी जोरदार घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे पोलिस बंदोबस्तही जास्त होता.

Web Title: For that price demand Workers of Swabhimani along with Raju Shetty protest against Rajarambapu factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.