चार वर्षांत प्रथमच केळीला मिळाला उच्चांकी दर, उत्पादकांमध्ये फिलगुड
By अशोक डोंबाळे | Published: September 29, 2022 11:28 AM2022-09-29T11:28:05+5:302022-09-29T11:28:47+5:30
नवरात्रोत्सवामुळे केळीला आणखी मागणी वाढली
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यात उत्पादित होत असलेल्या केळीला यावर्षी चार वर्षांत प्रथमच विक्रमी दर मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० पेक्षा अधिकचा दर मिळालेला नव्हता. मात्र, देशांतर्गतसह जागतिक बाजारपेठेतही सांगलीच्या केळीला मोठी मागणी वाढल्याने प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. लागवडीपासून असा दर प्रथमच मिळाल्यामुळे केळीला यंदा सुगीचे दिवस असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.
विशेषत: ऊस पट्ट्यातही केळीचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात ६७६.०५ हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे. एकरी ३० टनांपर्यंत केळीचे उत्पन्न मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे निर्यातीच्या केळीला १ हजार ५०० ते २ हजार ३०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे दर मिळाला आहे. आता नवरात्रोत्सवामुळे केळीला आणखी मागणी वाढली आहे.
...अशी झाली दरात सुधारणा
यंदा केळीचा हंगाम हा जून महिन्यापासून सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच केळीला ८०० ते एक हजार २०० रुपये क्विंटल, असा दर मिळाला होता. सप्टेंबरमध्ये प्रतिक्विंटल निर्यात केळीला १ हजार ५०० ते २ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे निर्यातदार व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांच्या संघर्षानंतर आता कुठे केळी उत्पादकांमध्ये समाधान आहे.
३६० टन केळीची निर्यात
इराण, इराक, मलेशिया, कुवेत आदी राष्ट्रांमध्ये १८ कंटनेरमधून ३६० टन केळींची निर्यात केली आहे. या सर्व केळीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
देशांतर्गत केळीला मागणी चांगली आहे. याबरोबरच दुबईसह अन्य देशातही केळीला मागणी चांगली असून, केळीला प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये ते २ हजार रुपये दर मिळत आहे. गेल्या चार वर्षांतील उच्चांकी दर मिळाला आहे. -मारुती टेंगले, केळी व्यापारी
ऊस लावून कंटाळलो होतो, म्हणूनच केळीची लागवड केली होती. प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये दर मिळाला आहे. बऱ्याच दिवसांतून चांगला दर मिळाला आहे. यामुळे उत्पादन आणि खर्चाचा मेळ बसला आहे. उसापेक्षा केळीतून चांगले उत्पन्न मिळाले. -अमोल पाटील, वसगडे, ता. पलूस (शेतकरी)
केळीचे जिल्ह्यातील क्षेत्र
तालुका - क्षेत्र (हेक्टर)
मिरज - १४१.२०
वाळवा - २५०.३५
शिराळा - ५
तासगाव - २२.२०
खानापूर - २९
पलूस - ४५
कडेगाव - २९
आटपाडी - ४१.२०
जत - ७७.१०
क. महांकाळ - ३६
एकूण - ६७६.०५