रिलेशनशीपसाठी जबरदस्ती; तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न
By घनशाम नवाथे | Published: March 8, 2024 09:32 PM2024-03-08T21:32:52+5:302024-03-08T21:33:04+5:30
सारंगविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घनशाम नवाथे/ सांगली : रिलेशनशीपसाठी महाविद्यालयीन तरूणीला कॅफेमध्ये बोलवून जबरदस्ती केल्यामुळे तिने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे खळबळ उडाली असून संशयित सारंग कांबळे (वय २२, रा. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित तरूणीने याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरज तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. काही दिवसापासून संशयित सारंग तिच्या पाठलागावर होता. दोन दिवसापूर्वी तिला ती महाविद्यालयातून बाहेर पडताच संशयित दिसला. त्यामुळे त्याला टाळण्यासाठी ती आतमध्ये गेली. तेव्हा सारंगने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पीडितेशी संपर्क साधला. ‘तू बाहेर आली नाहीस तर तुझ्या पाठीमागे घरापर्यंत येईन’ असे तिला धमकावले. त्यामुळे ती घाबरून बाहेर आली.
त्यानंतर त्याने तिला एका कॅफेत नेऊन रिलेशनशीपचा प्रस्ताव ठेवला. कॅफेमध्ये तिच्याशी जबरदस्ती करू लागला. पीडितेने नकार दिल्याने त्याने तिला तब्बल दोन तास कॅफेमध्येच थांबवून ठेवले. या प्रकाराला पीडिता घाबरली. घरी जातानाच तिने किटकनाशक घेतले. घरात गेल्यानंतर तिने कीटकनाशक पाण्यात मिसळून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबिय घाबरले. पालकांनी तिला धीर दिला. त्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलिसांत संशयित सारंगविरुद्ध फिर्याद दिली. सारंगविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.