शिगावमधील तरुणाने पिकवली परदेशी भाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:06 AM2019-08-04T01:06:01+5:302019-08-04T01:07:13+5:30
वयाच्या १७ व्यावर्षी कौस्तुभने डिप्लोमा इन टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असताना, सावर्डे (ता. हातकणंगले) गावच्या नातेवाईकांची विदेशी भाजीपाल्याची शेती पाहिली आणि आपण अशापद्धतीने पीक घेऊ शकतो, या जिद्दीने त्याने विदेशी पालेभाज्यांविषयी अभ्यास केला.
विनोद पाटील।
शिगाव : कष्ट आणि नवनिर्मितीच्या ध्यासाने शिगाव (ता. वाळवा) येथील कौस्तुभ बारवडे हा उच्चशिक्षित तरुण परदेशी भाजीपाला पिकवत आहे. वारणा काठावरील ऊस या हुकमी पिकापेक्षाही अधिक उत्पन्न घेता येऊ शकते, हे त्याने या प्रयोगातून दाखवून दिले आहे.
वयाच्या १७ व्यावर्षी कौस्तुभने डिप्लोमा इन टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असताना, सावर्डे (ता. हातकणंगले) गावच्या नातेवाईकांची विदेशी भाजीपाल्याची शेती पाहिली आणि आपण अशापद्धतीने पीक घेऊ शकतो, या जिद्दीने त्याने विदेशी पालेभाज्यांविषयी अभ्यास केला. या पिकासाठी लागणारा हंगाम, येणारा खर्च, लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अभ्यास करून गेल्यावर्षी त्याने वडील राजेंद्र बारवडे, चुलते सुकुमार बारवडे यांच्या सहकार्याने चेरी टोमॅटो, झुकेनी, रेड कॅबेज, ब्रोकोली यासारख्या विदेशी भाजीपाल्याची लागवड केली. त्यातून त्याने एक एकरात वर्षात आठ लाखांची उलाढाल केली होती.
यावर्षी त्याने झुकेनी, पॉपचाई या विदेशी भाजीपाल्याची लागवड केली आहे. झुकेनीला वार्षिक सरासरी भाव २५ ते ३५ रुपये मिळतो. त्याने काही व्यापाऱ्यांशी वर्षभराचे कंत्राट करून ३५ रुपये कायमचा भाव ठरवला आहे. त्यामुळे दर चांगला मिळायला मदत होते.
बेसिलचा सुगंध चांगला आहे. त्यामुळे हर्बल टी तयार करण्यासाठी त्याची पाने वापरली जातात. अन्य भाज्यांमध्ये आस्वाद घेण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. परदेशी भाजीपाला या भागात पहिल्यांदाच असल्याने त्यांना अधिक ज्ञान नव्हते. लागवडीपासून ते काढणीपर्यंत माहिती नव्हती. नातेवाईकांकडून माहिती करून घेतली व मजुरांनाही प्रशिक्षण दिल्यामुळे मजूरही काम चांगल्या पद्धतीने करू लागले. उत्पादित माल मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद या ठिकाणी पाठवतात, तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्येही या मालाला मागणी असते.
तरुणांनी शेतीकडे वळावे
नोकरीच्या मागे न लागता युवा पिढीने शेती व्यवसायाकडे वळायला हवे. योग्य नियोजन, बाजारात कशाची मागणी आहे, याचा अभ्यास करून शेती केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तरुण शेतकरी बांधवांना कोणतीही मदत, मार्गदर्शन करण्याची तयारी कौस्तुभ बारवडे यांनी दाखवली आहे.
वार्षिक सरासरी किलोला मिळणारे दर
झुकेनी- ३० ते ३५ रुपये -ब्रोकोली- २५ ते ३० -चेरी टोमॅटो- ३५ ते ४० -पॉपचाई- १५ ते २५ -बेसिल- मुंबई, पुणे - ३०, तर हैदराबाद - ५० रुपये