बिबट्यापासून संरक्षणासाठी वनविभागाच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:13+5:302021-07-19T04:18:13+5:30
वारणावती : शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे बिबट्यापासून बचाव करण्यासाठी वनविभागाने सूचना केल्या आहेत. तसेच धोक्याच्या ...
वारणावती : शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे बिबट्यापासून बचाव करण्यासाठी वनविभागाने सूचना केल्या आहेत. तसेच धोक्याच्या वेळी संपर्क करण्याचे आवाहनही केले आहे.
बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा किंवा रात्रीच्या वेळी पायी एकटे बाहेर फिरत असल्यास जवळ टॉर्च आणि काठी बाळगा. मोठ्याने गाणी लावा. जेणेकरून बिबट्या जवळ येणार नाही. तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे सोडू नका. बिबट्या अचानक जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. त्याला डिवचण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. अन्यथा तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. बिबट्या दिसल्यास १९२६ क्रमांकावर वनविभागाशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.