मगरीचे बळी वाढताना वन खात्याचा कागदी खेळ
By admin | Published: October 21, 2016 01:30 AM2016-10-21T01:30:17+5:302016-10-21T01:30:17+5:30
प्राणीमित्रांचा अडसर : ग्रामस्थ संतप्त; सात बळी, तर चाळीसहून अधिक जखमी
सोमनाथ डवरी ल्ल कसबे डिग्रज
कृष्णा नदीत औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत मगरींचा मोठा वावर आहे. यामुळे आतापर्यंत मगरीच्या हल्ल्यात सातवा बळी गेला असून, चाळीस जण जखमी झाले आहेत. तसेच कित्येक शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांचाही जीव गेला आहे. प्राणी गणनेनुसार या परिसरातीत नदीपात्रात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आहेत. वन विभाग प्रत्येक दुर्घटनेनंतर कागदी घोडे नाचवितो. प्राणीमित्रांचे कारण देतो. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, मगरींच्या हल्ल्यात अजून किती बळी जाणार, असा प्रश्न उभा आहे.
आतापर्यंत अनिकेत कदम (रा. कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ सप्टेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ मार्च २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) यांचा सातवा, असे मगरबळी गेले आहेत. सुमारे ४० नागरिकांवर मगरींनी हल्ले केले आहेत. पण मोटारी सुरू करणे, वैरण काढणे, जॅकवेल परिसरातील कामे, धुणे धुणे, अंघोळीसाठी अशा विविध कारणांनी नदीवर ग्रामस्थांना जावेच लागते.
औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगरींच्या गणनेत १९ मोठ्या व ३९ लहान मगरी आढळल्या आहेत. एक मगर एका गर्भारपणात सुमारे ४०-५० पिली देते. यातील चार-पाच जरी प्रौढ झाली तरी, मगरींच्या संख्येचे भीषण वास्तव समोर येते. २००३ मध्ये अनिकेत कदमच्या मृत्यूनंतर सुमारे दोन महिने पिंजरा लावला होता आणि आता संजय भानुसे यांच्या मृत्यूनंतरही मगर पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. पण मगर एकदाही सापडली नाही. त्यामुळे हा नुसताच खेळखंडोबा ठरला आहे.
याचदरम्यान काही प्राणीमित्र कायद्याची भीती दाखवत मगर पकडण्यात अडसर करतात. ‘नदीवर लोकांनी जाऊ नये किंवा मगरींचा प्रतिकार करा, ठोसे लावा, डोळा फोडा, पडजीभ दाबा’ यासारखे उपाय मगरीपासून जीव वाचविण्यासाठी ते सांगतात. त्यावेळी ग्रामस्थ ही प्रात्यक्षिके करून दाखविण्याचे आवाहन करतात. काही वेळेला जबाबदारी टाळण्यासाठी प्राणी मित्रांना वन विभागच पुढे करतो का? अशा प्रकारची शंका ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. उदासीनता झाकण्यासाठी वन विभाग असे प्रकार करतो, असा आरोप होत आहे.
वन विभागाकडून जखमींकरिता ५० हजार, गंभीर जखमींना एक लाख, तर मृतासाठी आठ लाख मदतीची घोषणा होते, मात्र प्रत्यक्षात कागदपत्रे गोळा करताना त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होतो. त्यामुळे ही मदत नक्की मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कागदी घोडे नाचविण्यात वनविभाग धन्यता मानत आहे.
सध्या नदीला मगर प्रतिबंधित संरक्षक जाळी बसविणे, सर्व्हेतून व प्रस्ताव सादर करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संमती आणि परिपत्रक काढले आहे. पण या जाळीचा उपयोगही किती होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.