जंगलांच्या आगी वन्यजीवांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:39+5:302021-04-23T04:27:39+5:30
बाबासाहेब परिट लोकमत न्यूज नेटवर्क बिळाशी : शिराळा तालुक्यात जंगलांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही विघ्नसंतोषी लोक ...
बाबासाहेब परिट
लोकमत न्यूज नेटवर्क
बिळाशी : शिराळा तालुक्यात जंगलांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही विघ्नसंतोषी लोक जंगलाला आग लावत आहेत. परंतु, त्यांचा शोध घेणे वन विभागाला अवघड जात आहे. वणव्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्यामुळे बिबटे व गवे लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढत आहे.
गेल्या वर्षभरात लोकवस्तीत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मांगले परिसरात काही बिबट्यांच्या पिलांचा तसेच पूर्ण वाढ झालेल्या एका बिबट्याचा खुजगावच्या जलसेतूवरून पडून मृत्यू झाला. शिराळा तालुक्यात दोन-चार दिवसांनी बिबट्याने शेळी व श्वान मारल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने घडत आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे आरक्षित केलेल्या जंगलाव्यतिरिक्त आरळा-गुढे पाचगणी पठार ते शेडगेवाडी फाट्यापर्यंतचा परिसर हा जंगलव्याप्त आहे. पावलेवाडीपर्यंत डोंगरावर बऱ्यापैकी झाडी आहे. परंतु, गेल्या काही वर्षात या जंगलांना बिबट्याच्या वावराच्या भीतीपोटी काही नागरिक आगी लावत आहेत. यामुळे बिबट्याचा वावर जंगलापेक्षा शिवारातील ऊसात व नदीकाठावरील परिसरातच जास्त असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्याभरापूर्वी बिऊर परिसरात बिबट्या एका लहान मुलाला घेऊन गेल्याची घटना घडली होती. स्वतःच्या हक्काचा अधिवास माणसाच्या हस्तक्षेपाने उद्ध्वस्त झाल्यामुळे बिबट्या व रानगवे यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवला आहे. याबाबत जंगलाचे अस्तित्व वाचवणे व वणव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी दीर्घ पल्ल्याचे कॅमेरे बसवण्याची गरज आहे. वणवे लावणार्यांवर कारवाई करून नैसर्गिक अधिवास वाढवल्यास रानगवे व बिबट्यांपासून होणारा त्रास थांबणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
कोट
वणवा लागल्यानंतर जमिनीतील चौदा प्रकारची अन्नद्रव्ये नष्ट होतात. मौल्यवान खाद्य प्रजातीचे गवत नष्ट होते. नैसर्गिकरित्या कंपोस्ट खत निर्मिती थांबते. वणव्यांमुळे अन्नसाखळी तुटते.
- जी. एच. लंगोटे, वनक्षेत्रपाल, चांदोली अभयारण्य.
कोट
वणव्यांमुळे सरपटणारे प्राणी नष्ट होत आहेत. प्रदूषणातही वाढ होत आहे. पक्ष्यांची घरटी नष्ट होऊन मधमाशांची पोळी जळतात. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे.
- डी. के. यमगर, वनपाल, चांदोली अभयारण्य.