आगीमुळे डोंगर परिसरातील वनसंपदा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:20+5:302021-03-20T04:24:20+5:30
फोटो ओळ : आगीत जळून खाक झालेला चिंचणी-तडसर परिसरातील डोंगर. प्रताप महाडिक कडेगाव : तालुक्यातील तडसर-चिंचणी सरहद्दीवरील डोंगर ...
फोटो ओळ : आगीत जळून खाक झालेला चिंचणी-तडसर परिसरातील डोंगर.
प्रताप महाडिक
कडेगाव : तालुक्यातील तडसर-चिंचणी सरहद्दीवरील डोंगर काही दिवसांपूर्वी जाळून खाक झाला. डोंगरात वणवा पेटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे येथील वनसंपदा धोक्यात आली आहे. पेटलेल्या वनव्यात झाडाझुडपांचे व वन्यजिवांचे मरण दिसत असताना, आग विझवण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत, हे कडेगाव तालुक्यातील चित्र धक्कादायक आहे. आता शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सह्याद्रीच्या रांगेत येणारे कडेगाव तालुक्यातील अनेक डोंगर हे गवताचे आगार म्हणून प्रसिद्ध आहेत. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी वनमंत्री असताना तालुक्यातील डोंगर परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे. या डोंगरांवर सागरेश्वर अभयारण्यातून बाहेर मुक्त संचार करणारे हरीण, चितळ, सांबर, आदी अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे. परंतु, उन्हाळ्यात डोंगरांना वणवा लागण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे.
डोंगर जळून खाक झाल्यामुळे जनावरांचा चारा नष्ट झाला आहे. तसेच प्राणीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असावेत, अशीही भीती व्यक्त होत आहे. या वणव्यातून वाचलेल्या प्राण्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वणव्यामुळे उजाड झालेल्या डोंगरातील हरणांचा त्रास शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. शेतकऱ्यांची पिके हरणांनी फस्त केली आहेत.
आता वनखात्याने वणवे रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट
ठोस उपाययोजनांची गरज
वणवे रोखण्यासाठी वन खात्याकडून होणाऱ्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. मात्र, गवताचे प्रमाण अधिक असलेल्या डोंगरावर मोठा वणवा पेटतो. वास्तविक काही अटी घालून शेतकऱ्यांना गवत कापून नेण्यास परवानगी दिली आणि चराईबंदी उठवली तर डोंगरातील वनसंपदा जतन करण्यासाठी शेतकऱ्यांचीही मदत होईल.