वाळवा येथे कृष्णेला आले गटारीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:48 AM2021-02-28T04:48:45+5:302021-02-28T04:48:45+5:30
फोटो ओळ : वाळवा येथे खेड ओढ्यातून आलेले दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. महेंद्र किणीकर लोकमत न्यूज ...
फोटो ओळ : वाळवा येथे खेड ओढ्यातून आलेले दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे.
महेंद्र किणीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळवा येथे खेड ओढ्यातून कित्येक गावचे सांडपाणी व मैला गटारीतून वाहत येऊन कृष्णा नदीत मिसळतो. तसेच कारखान्याचे रसायनयुक्त पाणीही याच ओढ्यातून नदीत येत आहे. यामुळे नदीला सध्या गटारीचे स्वरूप आले आहे.
हा ओढा येडेनिपाणी, कामेरीमार्गे आला आहे. भरीत भर कारखान्याचे दूषित पाणी याच ओढ्यातून येऊन नदीत मिसळत आहे. हुतात्मा कारखान्याच्या बाजूला असणाऱ्या नाल्यातून हे पाणी ओढ्यात येऊन नदीत मिसळत आहे. हे दूषित पाणी बघून आता नदीवर अंघोळीला जाणेही नागरिकांनी टाळले आहे.
ओढ्यालगतच्या जमिनीतून रासायनिक खतांचा निचरा येऊन ते पाणीही नदीत मिसळत आहे. याशिवाय गावातील कचराही ओढे व नाल्यातून वाहत येऊन नदीत मिसळत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन दुर्गंधी येत आहे. अनेक गावे हागणदारीमुक्त होत आहेत, पण पिण्याचे पाणी मैलायुक्त बनत आहे. यातच रसायनयुक्त दूषित पाणी या प्रदूषणात भर घालत आहे.
चाैकट
प्रक्रिया यंत्रणा उभारा
कृष्णा नदीत दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.