जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्याने राष्ट्रवादी पेचात
By Admin | Published: July 2, 2015 11:39 PM2015-07-02T23:39:33+5:302015-07-02T23:39:33+5:30
बाजार समिती निवडणूक : खासदारांशी सांगलीत सोबत, तर तासगावात विरोधाची भूमिका
दत्ता पाटील -तासगाव -तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे धूमशान सुरू झाले असतानाच, सांगलीतही बाजार समितीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सांगलीसाठी जिल्हा बँकेचा आघाडीचा फॉर्म्युला वापरण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसे झाल्यास कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या विरोधात लढण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी पेचात सापडल्याचे दिसत असून, दोन्ही निवडणुकांत आर. आर. आबा समर्थक कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १ आॅगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही तुल्यबळ पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी पॅनेल लावण्याची तयारी सुरू केली असली तरी, आघाडीबाबतही चर्चा होत आहे. भाजपकडून आघाडीसाठी खासदार संजय पाटील यांनी सुरुवातीलाच तयारी दर्शवली होती. राष्ट्रवादीत आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याबाबत एकमत होत नाही. परंतु स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. काही दिवसांपूर्वी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचीच मागणी केली होती. आमदार पाटील यांनीही, आपली लढाई खासदार संजयकाकांशी आहे, असे सांगून, तुम्ही एकसंध असाल, तर माझी कोणतीच हरकत नाही, असे म्हटले होते.
एकीकडे तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी खासदारांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची भाषा तासगाव तालुक्यातील आर. आर. पाटील समर्थकांतून होत असतानाच, दुसरीकडे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आखाड्यात मात्र जिल्हा बँकेचा फॉर्म्युला अंमलात येणे निश्चित आहे.
सांगली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कवठेमहांकाळ तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यातील आर. आर. पाटील समर्थक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होणार, हे स्पष्टच आहे. परिणामी सांगलीच्या निवडणुकीत आर. आर. पाटील समर्थक खासदार संजय पाटील यांच्यासोबत एकत्र येणार आहेत. त्यातूनच कवठेमहांकाळ तालुक्यात खासदारांच्या सोबत राहायचे आणि तासगाव तालुक्यात खासदारांच्या विरोधात लढायचे का, असा प्रश्न राष्ट्रवादीतच उपस्थित झाला आहे. दोन्ही ठिकाणच्या भिन्न भूमिकांमुळे नेमका कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत राष्ट्रवादी पेचात सापडल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिकार जयंत पाटील यांना
राष्ट्रवादीची तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविली आहे. जिल्हा बँकेनंतर सांगली बाजार समितीसाठी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणात बाजार समितीच्या निवडणुकीत कोणता निर्णय घेतला जाईल, याचा अंदाज आर. आर. पाटील समर्थकांना आलेला नाही.
४तासगाव बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढायची की भाजपशी आघाडी करून लढायची, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. ४ जुलैला जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. त्यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय झाल्यास, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या टप्प्यातच याबाबत भूमिका स्पष्ट होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे याचा फैसला केव्हा होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.