विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 07:55 PM2024-10-17T19:55:47+5:302024-10-17T19:57:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा दुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.

Former BJP MP Sanjay Patils son Prabhakar Patil is likely to contest elections from Tasgaon constituency | विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!

विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!

दत्ता पाटील, तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटला नाही. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात असेल, अशी शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच 'घड्याळ' हातात बांधणार असल्याची चर्चा आहे. यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे. 
महायुतीच्या फॉर्म्युल्याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेकडून तत्कालीन राज्यमंत्री अजितराव घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीत हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाईल, हे स्पष्ट झाले नाही. 

भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रभाकर पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे. मात्र महायुतीत हा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल, याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही. परंतु हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाईल,अशी चर्चा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच 'घड्याळ' हातात बांधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय पाटील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे लवकरच या मतदारसंघात मोठी बराजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे.

अजितराव घोरपडे यांची भूमिका गुलदस्त्यातच -
लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी खासदार विचार पाटील यांची धुरा सांभाळली होती. या निकालानंतर घोरपडे गट रिचार्ज झाला होता. त्यामुळे अजितराव घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असा दावा घोरपडे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत होता. मात्र अद्याप घोरपडे यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. त्यांच्या भुमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Former BJP MP Sanjay Patils son Prabhakar Patil is likely to contest elections from Tasgaon constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.