इस्लामपुरात माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:46 PM2022-03-23T13:46:42+5:302022-03-23T13:47:15+5:30
बँक कर्जाच्या वसुलीपोटी जातिवाचक शिवीगाळ करीत जबरदस्तीने दुचाकी घेतली काढून
इस्लामपूर : बँक कर्जाच्या वसुलीपोटी जातिवाचक शिवीगाळ करीत जबरदस्तीने दुचाकी काढून घेतल्याबद्दल एम. डी. पवार पीपल्स बँकेचे संचालक व माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह अन्य दोघांवर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सदानंद केशव चांदणे (वय ५१, रा. चर्च रोड, इस्लामपूर) यांनी पोलिसांत रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव अशोकराव पवार, हेमंत जाधव, खांबे साहेब (पूर्ण नाव नाही, रा. इस्लामपूर) अशा तिघांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदानंद चांदणे व सुवर्णा सुभाष चिकुर्डेकर यांनी एकत्रितरीत्या बँकेतून ऑक्टोबर २०१८ मध्ये घरबांधणीसाठी सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांचे हे कर्ज थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी जानेवारी ते १६ मार्चअखेर दोघांकडे तगादा लावण्यात आला होता. २२ जानेवारी रोजी पवार यांनी चांदणे यांना बँकेत बोलावून कर्ज भरले नसल्याबाबत विचारणा करीत त्यांची दुचाकी (एमएच १० डीके ८२५७) ही जबरदस्तीने काढून घेतली. तसेच सहकर्जदार महिलेच्या नावाने शिवीगाळ केली.
त्यानंतर हेमंत जाधव व खांबे यांनी चिकुर्डे येथील चांदणे आणि सुवर्णा चिकुर्डेकर यांच्या महिला उद्योग कारखान्यावर जाऊन उद्योगसमूहाच्या चाव्या द्या, नाही तर मारहाण करीत तेथून बाहेर काढण्याची धमकी दिली. १९ फेब्रुवारी रोजी जाधव यांनी चांदणे यांना बँकेत बोलावून घेतले. त्यावेळी वैभव पवार यांनी ‘पैसे भर, नाही तर तुझ्या घरादाराला कुलूप लावीन,’ असे धमकावत जातिवाचक शिवीगाळ करून त्यांना बाहेर काढले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.