माजी संचालकांचे लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे

By admin | Published: October 11, 2015 11:06 PM2015-10-11T23:06:25+5:302015-10-12T00:39:53+5:30

जिल्हा बँक घोटाळा : आज सुनावणी

Former Directors' Attendive Judicial Decision | माजी संचालकांचे लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे

माजी संचालकांचे लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे

Next

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी, १२ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी निकाल अपेक्षित असल्यामुळे, माजी संचालकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी शंभरजणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयीन सुनावणीमुळे त्यांनी गत आठवड्यात सुनावणीचे कामकाज १६ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या माजी संचालकांचे लक्ष गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागले होते. न्यायालयाने पुन्हा १२ आॅक्टोबर ही तारीख दिली आहे. जवळचीच तारीख मिळाल्याने संचालकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी, सोमवारी होणाऱ्या सुनावणीला त्यांना निर्णयाची अपेक्षा आहे.
जिल्हा बँकेच्या या घोटाळा प्रकरणात माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. नऊजण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर सुनावणी होणार असल्याने सुनावणीनंतरची तारीख म्हणणे मांडण्यासाठी मिळावी, अशी मागणी यातील बहुतांश माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी अधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. चौकशी अधिकाऱ्यांची सुनावणी ६ आॅक्टोबरला असल्याने त्यापूर्वी न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घ्यावा, अशी विनंती माजी संचालकांनी केली होती.
याचिकेवरील निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी सूचना न्यायालयाने केली होती. न्यायालयीन आदेशाबाबत चौकशी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असेही सांगितले. त्यामुळे आरोपपत्रासंदर्भातील सुनावणीही १६ आॅक्टोबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांना काहीच करता येणार नसल्याने, न्यायालयामार्फत याचिकेवर पुढील सुनावणीस निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)

चौकशी १६ रोजी...
चौकशी अधिकाऱ्यांचीही चौकशी न्यायालयीन निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे १६ आॅक्टोबर रोजी त्यांनी सुनावणीची तारीख दिली आहे. याप्रकरणात जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या दिग्गज राजकीय नेत्यांची नावे असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. माजी अधिकाऱ्यांचीही नावे या प्रकरणात आहेत.

Web Title: Former Directors' Attendive Judicial Decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.