मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशाला हात लावत नाहीत; पण..; माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 04:10 PM2022-06-18T16:10:37+5:302022-06-18T16:17:16+5:30
आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
सांगली : देशात पहिले आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशालाही हात लावत नाहीत; पण सचिन वाझे, यशवंत जाधव यांनी माया गोळा करताना त्यांनी डोळे झाकले होते, अशी टीका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी केली. आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
बहुजन रयत परिषदेच्या नवनिर्धार संवाद अभियानासाठी ढोबळे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने अण्णा भाऊ साठे महामंडळासह विविध महामंडळांना साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली; पण दीड महिन्यात अध्यादेश काढला नाही. या महामंडळांना एक रुपयाही आलेला नाही.
बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. मातंग, ढोर, मोची, होलार, चांभार, धनगर समाजाच्या विकासासाठी कृतिशील आराखडा तयार करावा, अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करून समाजाला न्याय द्यावा, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, साकरे आयोगाच्या शिफारशीनुसार मातंग समाजाला न्याय द्यावा, पदोन्नतीचा अध्यादेश रद्द करावा, आदी मागण्यांबाबत सरकारकडून कोणताच निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडी अध्यक्षा कोमल साळुंखे यांची उपस्थिती होती.
बहुजन समाजासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यांचे जाहीरनामे वेगळे आहेत. त्यांच्यात ताळमेळ नाही. राज्यसभेला गोंधळ झाला, तसा होऊ नये यासाठी आमदारांना आलिशान हाॅटेलमध्ये ठेवले आहे. राज्यातील शेतकरी, बहुजन समाज मात्र समस्यांनी ग्रासला आहे. त्याकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.