'राष्ट्रवादी'शी एकनिष्ठच राहणार, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी दिला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:11 IST2025-03-03T19:08:30+5:302025-03-03T19:11:41+5:30
समडोळी : हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून युवानेते अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून सांगलीवाडी (ता. मिरज) येथे सुरू केलेली जयंत जनसेवा ...

'राष्ट्रवादी'शी एकनिष्ठच राहणार, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी दिला पूर्णविराम
समडोळी : हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून युवानेते अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून सांगलीवाडी (ता. मिरज) येथे सुरू केलेली जयंत जनसेवा नागरी सुविधा केंद्र हे नागरिकांच्या दृष्टीने वेळ आणि पैशाची बचत करणारे विनाशुल्क दालन निश्चितपणे उपयुक्त ठरेल असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगलीवाडीत शनिवारी आयोजित केलेल्या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज होते.
मी भाजपामध्ये जाणार अशी वावडी काहीजणांकडून उडवली जात आहे त्यात काही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशी मी एकनिष्ठ आहे, एकनिष्ठच राहणार आहे. तुमच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देत जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
एकाच छताखाली सोय
सांगलीवाडी येथील सर्वच घटकांना एकाच छताखाली आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड संबंधित शैक्षणिक दाखले मतदान, ओळखपत्र, शॉप ॲक्ट लायसन, प्रॉपर्टी कार्ड, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, सातबारा उतारा यासह शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सोय या केंद्राद्वारे विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पाटील म्हणाले, सांगलीवाडी या गावांमध्ये अद्याप एकोपा कायम आहे. सर्वांना समान न्याय या तत्त्वावर विकासकामासाठी कमी पडणार नाही. अभिजित कोळी यांनी जयंत जनसेवा नागरी सुविधा केंद्राच्या संकल्पनेची माहिती दिली. यावेळी माजी नगरसेविका अर्पणा कदम, महाबळेश्वर चौगुले, सच्चिदानंद कदम, कमल गोरे, मदन पाटील विजय पाटील, आकाराम कदम, सचिन चव्हाण, सुनील चव्हाण, श्यामराव मगदूम उपस्थित होते.