बेळगावच्या माजी आमदाराला ७० व्या वर्षी झाली पुत्रप्राप्ती; सांगली महापालिकेकडून दाखला : सुनेची पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:27 AM2019-04-29T00:27:13+5:302019-04-29T00:27:17+5:30
सांगली : मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुनेला मालमत्तेतील हिस्सा मिळू नये, यासाठी बेळगाव येथील ७० वर्षीय माजी आमदाराने २०१६ मध्ये ...
सांगली : मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुनेला मालमत्तेतील हिस्सा मिळू नये, यासाठी बेळगाव येथील ७० वर्षीय माजी आमदाराने २०१६ मध्ये पुत्रप्राप्ती झाल्याचा दावा केला आहे. सांगलीच्या महापालिकेने मूल झाल्याचा जन्मदाखलाही त्यांना दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी तक्रार माजी आमदाराच्या सुनेने रविवारी सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
माजी आमदाराच्या मुलाचे आठ वर्षांपूर्वी पंढरपुरातील एका राजकीय घराण्यातील तरुणीशी लग्न झाले होते. दोन वर्षे संसार केल्यानंतर सून माहेरी पंढरपूरला गेली. ती तिथेच राहू लागली. दरम्यानच्या काळात तिच्या पतीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. पंढरपूर येथे माहेरी राहत असलेल्या सुनेला मालमत्तेचा हक्क द्यावा लागणार होता. यासाठी माजी आमदार असलेल्या सासऱ्याने ७० व्या वर्षी अपत्यप्राप्ती झाल्याची नोंद घातली आहे. २०१६ मध्ये सांगलीत एका नर्सिंग होममध्ये त्यांची पत्नी प्रसूत झाली. महापालिकेने तसा जन्मदाखलाही दिला असल्याचे सुनेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, असेही तिने म्हटले आहे.
चौकशी सुरू : प्रशांत पाटील
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील म्हणाले, बेळगावचा एक माजी आमदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध पंढरपुरात राहणाºया या सुनेने तक्रार केली आहे. त्यांच्या सासºयाने त्यांना अपत्यप्राप्ती झाल्याची खोटी नोंद घातल्याचे सुनेचे म्हणणे आहे. त्यांनी जी काही कागदपत्रे दिली आहेत, त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.